Shubhanshu Shukla
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नासाच्या 'ॲक्झिअम-४' या यशस्वी अंतराळ मोहिमेचे पायलट शुभांशु शुक्ला यांचे आज पहाटे अमेरिकेतून भारतात आगमन झाले. नवी दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन होताच केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, शालेय विद्यार्थी आणि इतर मान्यवरांनी त्यांचे 'भारत माता की जय'च्या घोषणा देत जंगी स्वागत केले. शुभांशु यांच्यामुळे देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील एका सुवर्ण क्षणाची नोंद झाली.
यावेळी शुभांशु यांच्यासोबत भारताच्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेसाठी निवडलेले दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्णन नायर हेदेखील भारतात परतले. ते या मोहिमेसाठी भारताचे राखीव अंतराळवीर होते. विमानतळावर मंत्री डॉ. सिंह यांनी शुभांशु यांच्या पत्नी कामना शुक्ला यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शुभांशु शुक्ला लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असून, त्यानंतर ते आपल्या मूळ गावी लखनऊला रवाना होतील.
'भारतासाठी अभिमानाचा क्षण' : जितेंद्र सिंह
शुभांशु शुक्ला यांचे मायदेशी पुनरागमन हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले. "हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर इस्रोसाठीही गौरवाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य करणाऱ्या सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे," असे ते म्हणाले. "भारताचा अंतराळ गौरव भारतीय भूमीवर परतला आहे, कारण भारतमातेचे सुपुत्र शुभांशु शुक्ला आज पहाटे दिल्लीत दाखल झाले," असे सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.