

जम्मू, वृत्तसंस्था : 'ऑपरेशन त्रिनेत्र-2' या मोहिमेद्वारे जम्मू-काश्मीरातील पूँछ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. भारतीय सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेले सर्व दहशतवादी पाकिस्तानी आहेत. भारताच्या स्वांतत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. सोमवारी रात्री सुमारे 11 वाजून 30 मिनिटांनी सुरू झालेली चकमक मंगळवारी सकाळी संपली. जवळपास 9 तास सुरू असलेल्या या चकमकीत भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान तुफान गोळीबार करण्यात आला.
भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांचा या ऑपरेशनमध्ये समावेश होता. ऑपरेशन 'त्रिनेत्र-2' अंतर्गत पूँछ सेक्टरमध्ये नाकाबंदीनंतर सर्व ऑपरेशन राबवण्यात आल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. भारतीय सुरक्षा दलाकडून गेल्या दोन दिवसांपासून सर्च ऑपरेशन राबवले जात असून सोमवारी पूँछमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सीमेवर संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
तीन कर्मचार्यांची हकालपट्टी
पाकिस्तान दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपाखाळी जम्मू-काश्मीच्या प्रशासनाकडून तीन सरकारी कर्मचार्यांची हकालपट्टी केली आहे. तिघे जण टेरर फंडिंग आणि दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.