

IAF Suryakiran Air Show
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र सोमनाथ मंदिराच्या 'अमृत महोत्सव'निमित्त आज ( दि. ११) भारतीय वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' कसरती पथकाने आकाशात चित्तथरारक कसरती सादर केल्या. वायुसेनेच्या या विहंगम प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात आयोजित विशेष महापूजेत सहभाग घेतला. यानंतर कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला, जे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण परंपरेचे प्रतीक मानले जातात. या सुवर्णक्षणी भारतीय हवाई दलाच्या 'सूर्यकिरण' एरोबॅटिक्स टीमने सोमनाथ मंदिरावर चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
"आज प्रभास पाटणची ही पवित्र भूमी दैवी तेजाने न्हाऊन निघाली आहे. महादेवाचे हे प्रकटीकरण, आकाशातून होणारी पुष्पवृष्टी, कला, संगीत आणि नृत्याचे हे भव्य सादरीकरण, वैदिक मंत्रांचा जयघोष, गर्भगृहात सुरू असलेले शिव पंचाक्षरी स्तोत्राचे अखंड पठण आणि या सर्वांच्या जोडीला समुद्राच्या लाटांची ही गर्जना... हे सर्व पाहून असे वाटते की जणू संपूर्ण सृष्टी एकस्वरात जयघोष करत आहे: जय सोमनाथ!"
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "११ मे १९९८ रोजी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. देशाचे खरे नायक असणार्या आपल्या शास्त्रज्ञांनी भारताची क्षमता संपूर्ण जगाला दाखवून दिली. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली. भारतावर विविध निर्बंध लादण्यात आले. यानंतरही १३ मे रोजी आणखी दोन अणुचाचण्या घेण्यात आल्या. भारताची राजकीय इच्छाशक्ती खरोखरच किती ठाम आणि अतूट आहे, हे या घटनेने जगाला सिद्ध करून दाखवले. त्या वेळी संपूर्ण जगाचा दबाव भारतावर होता. तरीही, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने हे सिद्ध केले की, आमच्यासाठी 'राष्ट्र' हेच सर्वप्रथम असते. पृथ्वीवरील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही; कोणतीही शक्ती भारताला दबावापुढे नमण्यास भाग पाडू शकत नाही, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी गुजरातमध्ये दाखल झाले, जिथे त्यांनी सोमनाथमध्ये एका भव्य रोडशोमध्ये सहभाग घेतला. 'सोमनाथ अमृत महोत्सवा'च्या निमित्ताने या रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातच्या गीर सोमनाथ येथे पंतप्रधानांनी सर्वप्रथम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांनी या भव्य रोडशोमध्ये सहभाग घेतला, जिथे त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.