Somnath Temple | सोमनाथ : अखंड श्रद्धेचे महापर्व

Somnath Temple | सोमनाथ : अखंड श्रद्धेचे महापर्व
Published on
Updated on

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सोमनाथ मंदिर हे केवळ श्रद्धास्थान नसून भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थान, स्वाभिमान आणि अखंड जिद्दीचे प्रतीक आहे. 2026 मधील ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हजार वर्षांच्या संघर्ष, पुनर्बांधणी आणि राष्ट्रीय आत्मविश्वासाच्या इतिहासाला नव्या पिढीसमोर अभिमानाने उभे करत आहे.

सोमनाथ मंदिर भारतातील केवळ एक प्राचीन मंदिर नसून, भारताच्या अभेद्य संस्कृतीचे आणि धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. अरबी समुद्राच्या किनार्‍यावर उभे असलेले हे ज्योतिर्लिंग केवळ श्रद्धेचे केंद्र नाही; तर आक्रमण, पुनर्बांधणी, आत्मसन्मान, राज्यकारभार आणि राष्ट्रीय पुनर्जागरण असा इतिहास आणि वर्तमान आहे. 2026 मध्ये आपण साजरे करीत असलेले सोमनाथ स्वाभिमान पर्व हे या प्रवासाला नव्या पिढीसमोर आत्मविश्वासाने, अभिमानाने आणि संतुलित भावनेने मांडणारा वळणबिंदू आहे.

1026 मध्ये गझनीने सोमनाथवर सर्वप्रथम आक्रमण केले. हे आक्रमण धर्मयुद्ध तर होतेच; पण ती व्यापारमार्ग आणि सोमनाथमध्ये असलेल्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करणारी आक्रमक कारवाई सुद्धा होती. गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्याच्या वेरावलजवळील त्या काळी पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर होते, प्रभास पाटण. येथेच सोमनाथ मंदिर होते जे त्या संपूर्ण किनारी अर्थव्यवस्थेचे आणि स्थानिक राजसत्तेचे प्रतीक होते. हे मंदिर फोडणे म्हणजे संपूर्ण व्यवस्था नष्ट करणे होते. औरंगजेबाच्या 1706 च्या आदेशानंतर, सोमनाथवर अनेक वेळा आक्रमण करण्यात आले, मूर्ती फोडल्या गेल्या; पण एवढे होऊनही सोमनाथ यात्रेचा मार्ग नष्ट झाला नाही आणि त्यावरील श्रद्धाही कमी झाली नाही. सोमनाथावर झालेल्या प्रत्येक आक्रमणानंतर स्थानिक समाज, व्यापारी, साधू-संत, नंतर मराठा व पुढे स्वातंत्र्योत्तर नेतृत्व, कोणी ना कोणी नव्याने उभे राहिले आणि सोमनाथाचे संरक्षण केले. त्यामुळे सोमनाथचा इतिहास केवळ पीडित इतिहास नाही, तर तो प्रतिकार आणि पुनरुत्थान दोन्हींचा एकत्रित इतिहास आहे.

सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते

सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते भूगोलाने नव्हे, तर इतिहासाने जोडलेले आहे. अलाउद्दीन खिलजीसारखे आक्रमक गुजरातकडे सरकले आणि सौराष्ट्र-सोमनाथवर हल्ले करणे त्यांच्यासाठी सोपे झाले. महाराष्ट्रातील राजनीतिक स्थैर्य कोसळले की पश्चिम किनार्‍याला धोका वाढतो, हा पहिला ऐतिहासिक धडा येथेच दिसून आला. शिवरायांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य, नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या संघर्षातून टिकून राहिले. पुढे पेशवाईच्या काळात या स्वराज्याने दक्षिण ओलांडून उत्तर-पश्चिम भारतापर्यंत पाय रोवले. मराठा फौजा कृष्णा-गोदावरी पार करत गुजरातकडे गेल्या आणि काही दशकांतच काठियावाड परिसरातील मोगल सामर्थ्य जवळजवळ निष्प्रभ झाले. या बदलत्या शक्तिसंतुलनात सोमनाथ पुन्हा भारतीय राजसत्तेच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आले.

मराठा साम्राज्य आणि सोमनाथ

मराठा साम्राज्याचा सोमनाथशी संबंध सांस्कृतिक, आर्थिक आणि सामरिक या तीन स्तरांवर आहे. सांस्कृतिक स्तरावर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा सर्वात मोठा अध्याय. इंदूरच्या होळकर घराण्याची ही राणी, जी महाराष्ट्रातील मराठा राजवटीचा भाग होती, त्यांनी 1783 मध्ये सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. जवळपास शतकभर भग्नावस्थेत असलेले हे मंदिर त्यांनी स्वतःच्या खजिन्यातून पुन्हा उभे केले. इतकेच नव्हे, समुद्राच्या लाटांच्या धक्क्यांपासून, तसेच भविष्यातील नौदल गोळीबारापासून संरक्षण मिळावे, म्हणून नवीन मंदिर थोडे आतल्या बाजूला उभे केले. हा निर्णय फक्त श्रद्धा म्हणून न बघता राज्यकारभारातील स्पेशल इंटेलिजंस म्हणून पाहिला तर अहिल्यादेवी होळकर यांचे दूरदर्शी नेतृत्व दिसून येते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ सोमनाथचेच पुनरुज्जीवन केले असे नाही तर काशी विश्वनाथाचे पुनरुज्जीवन, गया येथे घडवलेली कामे, द्वारकेतील मंदिरांचे सुशोभीकरणही त्यांनी केले. यामागे त्यांचे एकच तत्त्वज्ञान होते आणि ते म्हणजे मोगल काळात जखमी झालेली सभ्यता दगड-दगडातून पुन्हा उभी करणे. होळकर-शिंदे-भोसले अशा सरदारांची भूमिकाही यात महत्त्वाची होती. सोमनाथ हा त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा एक महत्त्वाचा उपक्रम होता. आर्थिक स्तरावर, मराठ्यांनी सोमनाथ-वेरावल परिसराला केवळ तीर्थक्षेत्र म्हणून नव्हे, तर महसुली मालमत्ता म्हणूनही समजून घेतले. यात्रेकरू कर, बंदरांवरील पायलटेज शुल्क, आसपासच्या जमीन महसुलावर प्रतीकात्मक देवस्थानाचे हक्क, या सर्वांमधून येणारा पैसा उत्तर भारतातील मोहिमा, किल्ल्यांची देखभाल आणि प्रशासनीक खर्च यात वापरला गेला. त्यामुळे सोमनाथच्या सुरक्षेवर खर्च करणे, किल्ले-ठाणी आणि रक्षक ठेवणे हे मराठा सत्तेसाठी भावनिकच नव्हे, आर्थिकद़ृष्ट्याही योग्य होते.

सामरिक स्तरावर, सोमनाथ-काठियावाड हा भाग मराठा सत्तेसाठी पश्चिमेकडील बफर झोन होता. सोमनाथ, वेरावल आणि आसपासचे किल्ले व ठाणी हे फ्रंटलाईन आऊटपोस्ट म्हणून वापरले गेले. मंदिराचा गाभारा जरी आध्यात्मिक असला, तरी त्याच्या बाहेरील वाड्यांमध्ये आणि चौक्यांमध्ये एका उगवत्या हिंदवी सत्तेचे पुढील मोर्चे उभे होते. या संपूर्ण मराठा इतिहासात गायकवाडांचा स्वतंत्र उल्लेख जरूरी आहे. मूळ महाराष्ट्रातून गेलेले हे बडोद्याचे सरदार गायकवाड यांनी गुजरातच्या अनेक भागांसह काठियावाड परिसरावर दीर्घकाळ राज्य केले. त्यांच्या वतीनेच स्थानिक वतनदार, कारकून, पटेल-पटवारी या संपूर्ण यंत्रणेने सोमनाथ आणि आसपासचा भाग चालवला. यामुळे सोमनाथचा रोजचा कारभार आणि मोठ्या निर्णयांचे वजनही, मराठा सत्तेच्या कक्षामध्येच राहिले होते.

ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली...

19 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने मराठा साम्राज्य मोडीत काढण्यास सुरुवात केली, तेव्हा सोमनाथ परिसरातील देवस्थान जमिनी आणि महसूल हा करारांमधील महत्त्वाचा मुद्दा बनला. मराठा घराणी, विशेषतः गायकवाड आणि कंपनी सरकार यांच्यात जो काही तह, करार झाला, त्यात या प्रदेशातील धार्मिक जागा आणि त्यांचे महसुली हक्क यावर अनेक कलमे लावण्यात आली होती. शेवटी महसुली नियंत्रण कंपनीकडे गेले. पूजा-उपासना स्थानिक पुजारी आणि संस्थांकडे ठेवण्यात आली. प्रतीकात्मकद़ृष्ट्या पाहिले तर, सोमनाथ मराठा राजवटीकडून ब्रिटिश राजवटीकडे गेले.

2026 चे स्वाभिमान पर्व!

स्वातंत्र्यानंतर भारताने हा सर्व इतिहास लक्षात घेऊन काम करणे सुरू केले. जुनागढ भारतात समाविष्ट झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ पुनर्बांधणीचा संकल्प घेतला. हा संकल्प केवळ धार्मिक नव्हता, तर राष्ट्रीय स्वाभिमानाचा होता. पंडित नेहरू, महात्मा गांधी यांचा मात्र याबाबत वेगळा द़ृष्टिकोन होता. राज्याने थेट मंदिराशी ओळख जोडू नये, धर्मनिरपेक्ष चौकट राखावी, हा त्यांचा आग्रह होता. के. एम. मुन्शी आणि सरदार पटेल यांनी मात्र भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष राहील; पण जुन्या स्मृती कायम ठेऊन, असे स्पष्ट केले होते. 1951 मध्ये उभे राहिलेले आधुनिक सोमनाथ मंदिर हा त्याचाच परिपाक होते.

2026 मध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वाने याला नवा अर्थ दिला आहे. गझनीच्या महमूदच्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होत असताना, देशाने हा प्रसंग अखंड श्रद्धेचा महापर्व म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. गुजरात सरकार, केंद्र सरकार, अनेक सांस्कृतिक संस्था, साधू-संत, विद्वान, आणि सर्वसामान्य भक्त यांच्या सहभागातून हे स्वाभिमान पर्व आकाराला आले. 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, अखंड मंत्रजप, व्याख्यानमाला, प्रदर्शने आणि यात्रांमधून एकच संदेश दिला गेला आणि तो म्हणजे भारताला कोणीही कितीही वेळा तोडण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा आत्मा टिकून राहतो. या पर्वानिमित्त देशभरातून यात्रेचे कार्यक्रम आणि दिल्लीपासून निघालेली स्वाभिमान यात्रा हेच दर्शवते की, सोमनाथ फक्त गुजरातचा विषय नसून, तो अखिल भारताचा विषय आहे. वेगाने शहरी होत असलेल्या, डिजिटल पिढीच्या युवकांसाठी हे स्वाभिमान पर्व जणू इतिहासाची जाणीव वर्गात नव्हे, प्रत्यक्ष स्थळी अशी भूमिका निभावत आहे.

या सर्व प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आणि नेतृत्व विशेष उल्लेखनीय आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी 10-11 जानेवारीला सोमनाथ येथे जाऊन या पर्वात थेट सहभाग घेतला, कार्यक्रमांना संबोधित केले, स्वाभिमान आणि अखंड श्रद्धा या संकल्पनांना वर्तमान भारताच्या संदर्भात जोडून मांडले. त्यांच्या भाषणांतून आणि उपस्थितीतून एक महत्त्वाचा संदेश गेला आणि तो म्हणजे- सांस्कृतिक स्मृतीचा सन्मान करणे म्हणजे कोणाविरुद्ध द्वेष बाळगणे नाही, उलट, स्वविश्वासाने उभ्या असलेल्या भारताचेच हे लक्षण आहे. म्हणूनच, या पर्वाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करणे म्हणजे एका सरकारचा नव्हे, तर एका द़ृष्टिकोनाचा गौरव करणे आहे, इतिहासाकडे कमीपणाच्या भावनेने नव्हे, तर आत्मविश्वासाने पाहावा असा दृष्टिकोन यामागे आहे.

सोमनाथ स्वाभिमान पर्वाने आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली की, इतिहास हे फक्त हिशेब-मांडणारे पुस्तक नाही; तो राष्ट्राचा सामूहिक मानस आहे. या मानसाचे स्वरूप काय असावे, याचे उत्तर आपल्यासमोर स्पष्ट आहे. जखमा विसरायच्या नाहीत; पण त्यावरच अडकलो तर भविष्य घडत नाही. पुनर्बांधणीची, पुनरुत्थानाची संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर सोमनाथची कथा सतत सांगितली गेली पाहिजे. महमूदपासून आणि औरंगजेबापासून, अहिल्याबाई आणि गायकवाडांपासून, पटेल-मुन्शी ते थेट आजच्या नेतृत्वापर्यंत. सोमनाथच्या घंटानादात आजही एकच ध्वनी घुमतो आणि तो म्हणजे आक्रमण होऊ शकतात, सत्ताबदल होऊ शकतात, वाद होऊ शकतात; पण जो समाज आपल्या स्मृतीचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा धागा तुटू देत नाही, त्याला इतिहास संपवू शकत नाही. 2026 चे स्वाभिमान पर्व ही त्या अढळ सत्याची, हजार वर्षे चाललेल्या भारतीय जिद्दीची घोषणा आहे. आणि भारताच्या नेतृत्वाने ती जाणीवपूर्वक, सन्मानाने आणि उत्तरदायित्वाने देशासमोर मांडली, यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचे अभिनंदन करावेच लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news