India @ 75 विशेष : टिळक, आगरकर आणि चिपळूणकरांच्‍या शाळेने इंग्रजांच्या शाळांनाही टाकले होते मागे | पुढारी

India @ 75 विशेष : टिळक, आगरकर आणि चिपळूणकरांच्‍या शाळेने इंग्रजांच्या शाळांनाही टाकले होते मागे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकमान्य टिळकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सर्वश्रुत आहे. टिळकांनी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांमध्‍ये टिळकांचे नाव घ्यावे लागते. अगदी सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात एक खासगी शाळाही सुरू केली होती. या शाळेची गुणवत्ता इतकी चांगली होती की, या शाळेचा मॅट्रिकचा निकाल त्या काळात ८९ टक्के इतका उत्तम असायचा. ( India @ 75 विशेष )

 स्‍वराज्‍य मिळाले तर पहिला निर्णय मोफत आणि सक्‍तीचे शिक्षण…

टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी शाळेची फी अत्यल्प ठेवली होती. “आम्हाला स्वराज्य मिळाले तर आम्ही पहिल्याने शिक्षण सक्तीचे व मोफत करू. मग दुसरी गोष्ट,” असे खुद्द लोकमान्य टिळकांनीच एका प्रसंगात म्हटलं होते. भा. द. खेर यांनी लोकमान्य टिळक दर्शन या ग्रंथात या शाळेबद्दलचे विवेचन केले आहे. टिळक १८७९ला एल.एल.बी. पास झाले. टिळक आणि आगरकर यांनी मिशनरींच्या धर्तीवर खासगी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाचा प्रश्न हाती घेऊनच देशाचा उद्धार होऊ शकेल, याबद्दल टिळकांना खात्री होती. ही शाळा सुरू करताना त्यांना सुरुवातीला फार अडचणी आल्या. शाळा चालवण्यासाठी दरमहा ७५रुपये इतका खर्च अपेक्षित होता. टिळक आणि आगरकरांनी एका श्रीमंत व्यक्तीकडे शाळेसाठी आर्थिक मदतीची मागणीही केली होती; पण त्या व्यक्तीने नकार दिला.

India @ 75 विशेष : …तरच देशोद्धार होऊ शकतो

या वेळी विष्णूशास्त्री चिपणळूणकर नोकरी सोडून पुण्याला आले होते. खेर त्यांच्या पुस्तकात म्हणतात, “देशातील जनतेचे शिक्षण देशातील लोकांच्या हाती राहिले तर देशोद्धार होऊ शकतो, असे टिळक, आगरकर आणि शास्त्रीबुवांचेही मत होते. समान ध्येयाने प्रेरित झालेले हे तिघेही तरुण एकत्र आल्यानंतर शाळेची कल्पना प्रत्यक्षात उतरणे कठीण नव्हते.”

India @ 75 विशेष : एका वर्षात शाळेत सव्वतीनशे विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

१८८०ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. अगदीच कमी वेळात चिपळूणकर, टिळक, आगरकर यांच्या विद्वत्तेचा दबदबा सर्वत्र पसरला. १८८१ला या शाळेत सव्वतीनशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर १८८५ला या शाळेत १ हजार विद्यार्थी होते. १८८४ला या शाळेचा मॅट्रिकचा निकाल ८९ टक्के इतका लागला. १८८० ते पुढे सात वर्ष या शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. पुढे याच शाळेतील सहकाऱ्यांच्या मदतीने टिळकांनी मराठी आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली.

 

 

 

Back to top button