नवी दिल्ली ः भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला आता फारसा वेळ लागणार नाही. उभय देशांतील व्यापार कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता आहे. सकारात्मक घडामोडींमुळे अमेरिका भारतावरील आयात शुल्क 50 टक्क्यांवरून 15 ते 16 टक्क्यापर्यंत करू शकते,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची दोन्ही देशांना प्रतीक्षा आहे. संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. मात्र, काही मुद्द्यांमुळे अद्याप दोन्ही देशांमध्ये हा करार होऊ शकलेला नाही. यामध्ये कृषी, डेअरी उत्पादने आणि भारताने रशियाकडून केलेली तेल खरेदी यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की, ते भारतीय शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाहीत. भारताची रशियाकडून तेल खरेदीही सुरूच आहे. पण आता या दोन्ही देशांच्या व्यापार कराराबाबत सकारात्मक घडामोडी पुढे आल्या आहेत.
भारत आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींमध्ये आतापर्यंत अनेक फेऱ्यांची चर्चा झाली आहे. दोन्ही देश व्यापार कराराच्या जवळ आहेत. जरी भारत किंवा अमेरिकेकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होऊ शकतो,अशी माहिती सूत्रांनी दिली.
रशियन तेल खरेदीवर काय परिणाम होऊ शकतो?
ट्रम्प यांनी यापूर्वी भारताला रशियाकडून तेल खरेदी न करण्याची अनेकदा धमकी दिली होती. आता ट्रम्प असा दावा करत आहेत की, पंतप्रधान मोदींशी त्यांचे बोलणे झाले असून भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. मात्र, भारताकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याबाबत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. दोन्ही देशांमधील व्यापार करारामध्ये भारताच्या रशियन तेल खरेदीचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या व्यापार कराराचा भारताच्या रशियन तेल खरेदीवर किती परिणाम होऊ शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर येणार
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान त्यांची आणि पंतप्रधान मोदींची अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये तेल खरेदीपासून ते रशिया-युक्रेन युद्धापर्यंतच्या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे पुतीन यांच्या दौऱ्याचा भारत-अमेरिका व्यापार करारावर काही परिणाम होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
टॅरिफमध्ये 15 ते 16 टक्क्यांपर्यंत घट शक्य
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे आयात शुल्कावरही परिणाम होईल. करारानंतर भारतावरील अमेरिकेचे आयात शुल्क 50 टक्के वरून 15-16 टक्केपर्यंत कमी होऊ शकते. विशेष म्हणजे, आयात शुल्क हेच दोन्ही देशांच्या संबंधांमधील तणावाचे मुख्य कारण आहे आणि जर अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क कमी केले, तर दोन्ही देशांचे संबंध पुन्हा रुळावर येऊ शकतात आणि अधिक दृढ होऊ शकतात.