पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादाला समर्थन दिल्याचा पाकिस्तानचा बिनबुडाचा आरोप फेटाळत भारताने शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. जागतिक दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे? हे जगाला चांगलेच माहिती आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला खडसावले. पाकिस्तानने भारतावर दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
"पाकिस्तानने केलेले बिनबुडाचे आरोप आम्ही जोरदारपणे फेटाळतो. जगातील दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे? हे संपूर्ण जगाला माहिती आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. "पाकिस्तानने दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तसेच स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याऐवजी स्वतः आत डोकावून पाहावे." असे त्यांनी सुनावले.
नैॠत्य पाकिस्तानमधील बलुच बंडखोरांनी (Balochistan train attack) गेल्या मंगळवारी जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला होता. ही रेल्वेगाडी ताब्यात घेत त्यातील २१४ जणांना सुमारे २४ तास ओलीस ठेवले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हा आरोप करण्यात आला. पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुच फुटीरतावादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. पण यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी या हल्ल्यामागे अफगाणिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की या प्रकरणी फोन कॉलद्वारे अफगाणिस्तानशी संपर्क साधल्याचे पुरावे आहेत.
"मी ज्याचा उल्लेख करत होतो तो असा होता की, या घटनेत, आमच्याकडे अफगाणिस्तानातून कॉल ट्रेस केल्याचे पुरावे आहेत." असेही ते म्हणाले. यासोबतच, खान यांनी भारतावर शेजारील देशांना अस्थिर करण्याचा आणि जागतिक स्तरावर 'हत्या मोहीम' चालवण्याचा आरोपही केला.
शफकत अली खान यांनी या हल्ल्याची जबाबदारी अफगाणिस्तानने स्वीकारावी, असे आवाहन केले. या संपूर्ण घटनेत हल्लेखोर अफगाणिस्तानातील सुत्रधारांच्या थेट संपर्कात होते. पाकिस्तानला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांकडून त्यांच्या भूमीचा वापर होऊ नये याची काळजी अफगाणिस्तानने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.