

नवी दिल्ली : भारत आणि रशियाच्या २३ व्या शिखर परिषदेपूर्वी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची गुरुवारी भेट झाली. यावेळी दोन्ही देशांतील संरक्षण आणि धोरणात्मक संबंध वाढवण्यावर चर्चा झाली. यावेळी भारताने रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणालीच्या अतिरिक्त तुकड्या खरेदी करण्यास उत्सुकता दर्शविली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे रशियन समकक्ष आंद्रे बेलोसोव्ह यांच्यात झालेल्या प्रमुख प्रतिनिधीमंडळ-स्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी एकूण संरक्षण आणि धोरणात्मक संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. बेलोसोव्ह यांच्याशी झालेल्या बैठकीत, राजनाथ सिंह यांनी स्थानिक उत्पादन आणि निर्यातीसाठी त्यांच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाची क्षमता वाढवण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाची पुष्टी केली. तसेच भारत-रशिया सहकार्य वाढवण्याच्या नवीन संधींवर प्रकाश टाकला.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान खूप प्रभावी ठरल्यामुळे रशियाकडून एस४०० क्षेपणास्त्र प्रणालींच्या अतिरिक्त तुकड्या खरेदी करण्याबाबत भारताने रशियाला रस दाखवल्याचे कळते. तसेच भारत रशियाकडून S-500 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा विचार देखील करू शकतो. रशियाने भारताला त्यांचे एसयू-५७ लढाऊ विमान देऊ केल्याचे समजते. दरम्यान, ऑक्टोबर २०१८ मध्ये, भारताने रशियासोबत एस४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच तुकड्या खरेदी करण्यासाठी ५ अब्ज डॉलर्सचा करार केला होता.
भारतीय सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणात रशियाचे पूर्ण सहकार्य : बेलोसोव्ह
राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी रशिया भारताला पाठिंबा देण्यास तयार आहे. तर रशियाचे संरक्षणमंत्री म्हणाले की, दक्षिण आशियाई प्रदेशातील संतुलनासाठी रशियाची भारतासोबतची भागीदारी ही एक महत्त्वाची बाब आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणात रशिया भारताला पूर्ण प्रमाणात सहकार्य करेल, असे बेलौसोव्ह म्हणाले. २००० मध्ये धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-रशिया द्विपक्षीय संरक्षण सहकार्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.