

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अवकाश क्षेत्रातील जगाने यापूर्वी कधीही पाहिला नाही, असा एक अनोखा भारतीय उपग्रह रविवारी अवकाशात झेपावला. बंगळूरस्थित एका खासगी स्पेस टेक स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या ‘द़ृष्टी’ नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
हा उपग्रह सीमा सुरक्षा आणि संरक्षणविषयक मोहिमांत महत्त्वाचा ठरणार आहे. साहजिकच या माध्यमातून, पाकिस्तान आणि चीनवर भारताच्या या तिसर्या डोळ्याची भेदक नजर राहणार आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन, कृषी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि विमा मूल्यमापन अशा विविध क्षेत्रांतील कामांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.
बंगळूरच्या गॅलेक्सआय या कंपनीने विकसित केलेला हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.29 वाजता कॅलिफोर्निया येथून हे प्रक्षेपण पार पडले. दाट ढग तसेच अंधारातूनही स्पष्ट छायाचित्रे टिपण्याची क्षमता असलेल्या या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. गॅलेक्सआयचे संस्थापक आणि सीईओ सुयश सिंग यांनी, भारत केंद्रस्थानी ठेवून हा उपग्रह डिझाईन करताना वेगळा विचार करण्याची गरज होती. दृष्टी हा भारतातील सर्वात वजनदार खासगी उपग्रह असण्यासोबतच तो सर्वाधिक रिझोल्यूशन देणार्या उपग्रहांपैकी एक आहे, असे सांगितले.
हे तंत्रज्ञान आधी उपलब्ध असते, तर ऑपरेशन सिंदूरमधील बॉम्ब हल्ल्याच्या नुकसानीचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी भारताला अमेरिकन व्यावसायिक उपग्रहावर अवलंबून राहण्याच गरज पडली नसती. देशाला या हल्ल्याची दर्जेदार चित्रे मिळवता आली असती, असे ते म्हणाले.
* 190 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह
* भारतीय खासगी कंपनीने तयार केलेला पहिलाच मोठा उपग्रह
* प्रतिकूल वातावरणातही अचूक, स्पष्ट छायाचित्रे घेण्याची क्षमता
गॅलेक्सआयचे मिशन दृष्टी हे आपल्या अंतराळ प्रवासातील एक मोठी झेप आणि यश आहे. तेे आपल्या तरुणांच्या नावीन्यपूर्ण ध्यासाचेे प्रतीक आहे. गॅलेक्सआयच्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
दृष्टी हा केवळ एक स्वतंत्र प्रयोग नाही, तर तो एका महत्त्वाकांक्षी उपग्रह समूहाचा पहिला टप्पा आहे. आम्ही एक उपग्रह समूह तयार करणार आहोत. पहिल्या उपग्रहाच्या यशानंतर आणखी नऊ उपग्रह अवकाशात पाठवले जातील.-
सुयश सिंग, सीईओ, गॅलेक्सआय, बंगळूर