

India-Pakistan War
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.९) सुरक्षेच्या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये भारताची पुढील रणनीती ठरली असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय सैन्य पाकच्या प्रत्येक हल्ल्याला आक्रमक प्रत्युत्तर देणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. भारत-पाक सीमेवरील सद्यस्थितीपासून ते आगामी रणनीतीपर्यंत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पाकच्या प्रत्येक नापाक हल्ल्याला भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे सैन्य प्रमुखांनी बैठकीत सांगितले असल्याचे समजते. दरम्यान, या बैठकीच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या माजी अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सैन्यातील माजी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा सद्यस्थितीत देशासाठी उपयुक्त ठरू शकतो. म्हणून पंतप्रधानांनी त्यांच्या सोबत विस्तृत चर्चा केली आहे, असे समजते.