

India Pakistan Tension
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दिल्लीतील आयटीओ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात हवाई हल्ल्याचा सायरन वाजवण्यात आला. यावेळी दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा घटनास्थळी उपस्थित होते.
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान घाबरला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर, पाकिस्तानकडून भारतीय सीमावर्ती भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले, ज्याला भारतीय सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानच्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी ३ वाजता दिल्ली आयटीओ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात हवाई हल्ल्याचा सायरन वाजवण्यात आला. यावेळी मुख्यालयाजवळील रस्त्यांवर शांतता होती. मात्र हा सायरन केवळ तयारीच्या उद्देशाने वाजवण्यात आला. यावेळी प्रवेश वर्मा म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालयाची इमारत दिल्लीतील सर्वात उंच इमारत आहे. म्हणून येथे सायरन वाजवून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. आता रात्रीपासून दिल्लीत आणखी काही ठिकाणी सायरन बसवले जातील. दिल्लीत जवळपास ५० सायरन बसवले जातील, असेही ते म्हणाले.
भारत- पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत, विशेषतः सरकारी इमारती, परदेशी दूतावास, न्यायालये, पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, इतर संवेदनशील आस्थापनांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. राजधानीत कोणत्याही संभाव्य दहशतवादी किंवा लष्करी धोक्याच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलांची मदत घेतली जात असल्याचे समजते.
दिल्ली पोलिसांनी रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बाजारपेठा, मॉल, उद्याने इत्यादी गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि पाळत वाढवली आहे. गुरुवारी रात्री सर्व दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आणि त्यांना ताबडतोब कर्तव्यावर परतण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व संवेदनशील भागात रात्रीची देखरेख वाढवण्यात आली आहे आणि प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते उपायुक्तांपर्यंत प्रत्येक स्तरावर सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सर्व विशेष आयुक्त आणि अधिकारी सतत बैठका घेत आहेत. दिल्लीतील अनेक भागात बॉम्ब निकामी पथकांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. तसेच दिल्लीत येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.