

इस्लामाबाद : भारताकडून आमच्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली असून, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बसलेल्या तडाख्याने पाक अजूनही सैरभैर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिलेल्या धारदार इशार्याच्या पार्श्वभूमीवर, आसिफ यांनी हे वक्तव्य केले आहे.
‘समा टी.व्ही.’ला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारताकडे दुर्लक्ष करत नाही किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्या विश्लेषणाच्या आधारे, मी भारताकडून असलेल्या युद्धाची किंवा इतर कोणत्याही रणनीतीची शक्यता नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण पूर्णपणे सतर्क राहिले पाहिजे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच आसिफ यांनी पाकिस्तान एकाच वेळी येणार्या धोक्यांना तोंड देण्यासाठी तयार असल्याचे म्हणत अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले होते. एका माध्यमाशी बोलताना ते म्हणाले होते, आम्ही पूर्व (भारत) आणि पश्चिम (अफगाणिस्तान) दोन्ही सीमांवर तोंड देण्यासाठी तयार आहोत. अल्लाहने पहिल्या फेरीत आम्हाला मदत केली आणि दुसर्या फेरीतही तो आम्हाला मदत करेल. जर त्यांना अंतिम फेरी हवी असेल, तर आमच्याकडे युद्धाशिवाय पर्याय नाही.
नवी दिल्लीतील ‘चाणक्य संरक्षण संवाद’ कार्यक्रमात बोलताना भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा केवळ फक्त ट्रेलर होता आणि तो 88 तासांत संपला, असे म्हटल्याने पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ भारत-पाकिस्तान तणावाशी जोडत, पाकिस्तानविरुद्धच्या भावी कारवाईचे संकेत असल्याचे विश्लेषक मानत आहेत. शेजारी देशाशी कसे वागावे, हे भारतीय लष्कर त्यांना दाखवून देण्यास समर्थ आहे, असा जळजळीत इशाराही भारतीय लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला होता.