

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्रसंधी असूनही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान गुरुवारी हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मात्र गुरुवारी नव्हे तर ३ जून रोजी संध्याकाळी ७.३० वाजेपासून पंजाबमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
मॉक ड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल. यासोबतच ब्लॅकआउट आणि हल्ल्यादरम्यान वाजणाऱ्या सायरनबद्दल माहिती देण्यात येईल. लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येतील. लोकांना अफवांपासून कसे दूर राहायचे, शत्रू देशाच्या प्रचारापासून कसे सतर्क राहावे, हे देखील सांगितले जाईल. यापुर्वीही एकदा मॉक ड्रिल करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये काही त्रुटी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही दूसरी मॉक ड्रील होणार आहे.
मॉक ड्रिल होत असलेल्या सीमेलगतच्या राज्यांमधील रहिवाशांना युद्धसदृश परिस्थितीत सतर्क राहण्याचे निर्देश दिले जातील. रुग्णालये, अग्निशमन केंद्रे आणि पोलिस स्टेशन यासारख्या अत्यावश्यक आपत्कालीन सेवा वगळता महत्त्वाच्या क्षेत्रांजवळ रात्री ८ वाजल्यापासून १५ मिनिटांचा नियंत्रित ब्लॅकआउट केला जाईल.
राज्याची आपत्कालीन तयारी वाढवण्यासाठी हरियाणा सरकार २९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून सर्व २२ जिल्ह्यांमध्ये "ऑपरेशन शील्ड" नावाचा एक प्रमुख राज्यव्यापी नागरी सुरक्षा सराव करणार आहे. गुरूवारी होणाऱ्या मॉक ड्रिलचे उद्दिष्ट आपत्कालीन यंत्रणांची चाचणी घेणे, नागरी प्रशासन, संरक्षण दल आणि स्थानिक समुदायांमध्ये समन्वय सुधारणे हे आहे, असे हरियाणा सरकारने सांगितले.
भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनंतरच नागरी संरक्षण मॉक ड्रिल करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानने सध्या सर्व लष्करी कारवाई आणि गोळीबार थांबवण्याचा द्विपक्षीय करार नुकताच केला आहे.