

India Pakistan Ceasefire Updates
श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर सीमावर्ती भागातील जनजीवन हळूहळू सामान्य होत आहे. आज सोमवारी सकाळी श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यासह इतर भागात परिस्थिती सामान्य असल्याचे दिसून आले. दल लेक (Dal lake) सरोवर परिसरात शांततेचे वातावरण आहे.
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर आम्हाला दिलासा मिळाला असल्याचे जम्मू-काश्मीर ट्रेडर्स अँड फेडरेशन मॅन्युफॅक्चरर्सचे सरचिटणीस बशीर कोंगपोश यांनी म्हटले आहे.
''आम्हाला आशा आहे की आता पर्यटक पुन्हा एकदा काश्मीरमध्ये येतील. आम्ही त्यांना खात्री देतो की आम्ही त्यांचे पुन्हा एकदा उत्साही स्वागत करु. पहलगाम हल्ल्यापूर्वी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. हॉटेल्स पूर्णपणे भरलेली होती. इथे येण्यासाठी काही धोका आहे का? याबाबत लोक अधिकाऱ्यांकडे खात्री करू शकतात.'' हवाई सेवा तसेच शाळादेखील सुरु कराव्यात, अशी विनंती त्यांनी नायब राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, रात्री गोळीबाराची कोणतीही घटना घडलेली नाही. अलिकडच्या दिवसांतील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ही पहिली शांत रात्र होती, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीवर सहमती झाल्यानंतर, रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री जम्मू-काश्मीर, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात शांतता राहिली, असे भारतीय लष्कराने सांगितले. गेल्या १९ दिवसांतील ही पहिली शांत रात्र होती. येथे गोळीबाराची कोणतीही घटना घडलेली नाही.
पूंछच्या सुरणकोटमध्येही परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. या सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र गोळीबार झाला होता. शस्त्रसंधीनंतर काल रात्री सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची कोणतीही घडना घडली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
श्रीनगर, पठाणकोट, राजौरी, अखनूर, जम्मू, कुलगाम, श्री गंगानगर आणि बडगाम येथेही परिस्थिती सामान्य असल्याचे दिसून आले आहे.