

Monsoon Forecast EL Nino vs IOD : पावसाळा सुरु झाला आणि प्रशांत महासागरातील 'एल निनो' (El Niño) सक्रियतेमुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असा अंदाज मे महिन्यात व्यक्त करण्यात आला होता. कारण 'एल निनो' सामान्यतः पाऊस खेचून नेतो; पण, आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी घडामोड हिंदी महासागरात घडत आहे. या महासागरात 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) नावाची हवामान प्रणाली मदतीसाठी तयार होत आहे.हवामान तज्ज्ञांच्या मते, जर जुलै आणि ऑगस्ट दरम्यान हिंद महासागरातील हा IOD 'पॉझिटिव्ह' (सकारात्मक) झाला, तर तो 'एल निनो'चा धोक्याचा प्रभाव बऱ्याच अंशी मोडून काढेल. थोडक्यात सांगायचं तर, दोन महासागरांमधील या 'कांटे की टक्कर'मध्ये जर आपल्या हिंद महासागराने बाजी मारली, तर भारतात मान्सूनचा पाऊस उत्तम होईल!
'एल निनो' आणि 'इंडियन ओशन डायपोल' (IOD )म्हणजे प्रत्यक्षात महासागरांच्या तापमानात होणारे बदल. 'एल निनो' हा प्रशांत महासागरातील समुद्राचे पाणी गरम झाल्यामुळे निर्माण होतो. हा एक प्रकारे मान्सूनचा 'व्हिलन' आहे, कारण यामुळे भारताकडे येणारे पाऊस-वारे कमकुवत होतात आणि देशात दुष्काळाची भीती निर्माण होते. बरोबर याच्या उलट , 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) हा आपल्या हिंद महासागराचा एक खास पॅटर्न आहे. जेव्हा हिंद महासागराचा आफ्रिकेकडचा भाग नेहमीपेक्षा जास्त गरम होतो, तेव्हा त्याला 'पॉझिटिव्ह IOD' म्हणतात. यामुळे समुद्रातून प्रचंड प्रमाणात पाण्याचे ढग तयार होतात आणि अरबी समुद्राकडून जोरदार वारे वाहत थेट भारताकडे येतात. 'एल निनो' आपल्याकडचा पाऊस कमी करण्याचा प्रयत्न करतो, तर 'पॉझिटिव्ह IOD' मान्सूनच्या ढगांना गती देऊन भारतात जोरदार पाऊस पाडण्यास मदत करतो.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊन जवळपास महिना झाला आहे. तरीही देशातील अनेक भाग अजूनही कोरडेच आहेत. अपुऱ्या पावसामुळे पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे; मागील वर्षांच्या तुलनेत सध्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे २३ टक्क्यांनी कमी आहे.
आता मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यावर आशा अवलंबून आहेत. तज्ज्ञांच्या मते, आगामी टप्प्यातील मान्सूनची वाटचाल 'एल निनो'चा प्रभाव कायम राहतो की, बळकट होणारा 'इंडियन ओशन डायपोल' (IOD )त्याचा प्रभाव रोखतो, यावर ठरणारा आहे. इंडियन ओशन डायपोल हा वेळेवर सक्रिय झाला तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती सुधारू शकते. याउलट, जर 'एल निनो'चा प्रभाव कायम राहिला आणि IOD कमकुवत राहिला किंवा उशिरा सक्रिय झाला, तर मान्सूनवरील ताण कायम राहू शकतो.
जागतिक हवामान संघटना आणि भारतीय हवामान विभागाच्या मते, 'इंडियन ओशन डायपोल' सध्या 'न्यूट्रल' स्थितीत आहे. त्याचा मान्सूनवर अद्याप लक्षणीय प्रभाव पडत नसला, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान तो 'पॉझिटिव्ह' होण्याची शक्यता आहे. असा बदल हिंदी महासागरातून अतिरिक्त आर्द्रता घेऊन येईल, यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मान्सून अधिक बळकट होऊ शकतो.
विशेष म्हणजे, १९९७ मध्ये अत्यंत शक्तिशाली 'एल निनो' असूनही, 'पॉझिटिव्ह' IOD मुळे मान्सूनची स्थिती सामान्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली होती. समुद्रपृष्ठाच्या तापमानात सामान्य स्थितीपेक्षा ०.४ अंश सेल्सिअसपर्यंतचा बदल 'न्यूट्रल' मानला जातो; त्यापेक्षा जास्त वाढ झाल्यास ती 'पॉझिटिव्ह' IOD ची स्थिती दर्शवते. सध्याची चिन्हे 'पॉझिटिव्ह' टप्प्याकडे निर्देश करत आहेत, तरीही समुद्रपृष्ठाचे तापमान आणखी वाढल्यासच मान्सूनला खऱ्या अर्थाने बळकटी मिळेल, असे मानले जात आहे.