

El Nino Impact India
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी (दि.२९) नैऋत्य मान्सून २०२६ साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार महाराष्ट्रासाठी चिंताजनक चित्र समोर आले आहे.
देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर २०२६) दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) केवळ ९० % पाऊस पडण्याची शक्यता असून, हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानले जाते. महाराष्ट्र हा मुख्यतः मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही विभागांत मोडतो. या दोन्ही विभागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे – मध्य भारतात ४३ % तर दक्षिण द्वीपकल्पात ४५ % संभाव्यता कमी पावसाची आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे मान्सून कोअर झोन (MCZ) मध्ये येतात. हाच झोन देशातील बहुतांश कोरडवाहू शेतीचा कणा आहे. IMD च्या अंदाजानुसार या झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची ४३ % शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामावर विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात आहे.
जून २०२६ या महिन्यातही देशभरात सरासरीच्या ९२ % पेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असून, महाराष्ट्रातही जूनमध्ये पाऊस सामान्यपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे.
IMD ने जून २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि काही अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही देशभरात सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याने रात्रीही उकाडा कमी होणार नाही.
सध्या प्रशांत महासागरावर (न्यूट्रल ) ENSO परिस्थिती असली तरी, IMD ने स्पष्ट केले आहे की मान्सून हंगामात एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिकदृष्ट्या एल निनो वर्षांमध्ये भारतात, विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात, पावसाची तूट अधिक जाणवते.
IMD ने आपल्या अहवालात नमूद केले आहे की सामान्यपेक्षा कमी पावसाचे दुष्परिणाम शेती, पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि पर्यावरण यांवर होऊ शकतात. महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाईची समस्या असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हा अंदाज अधिकच चिंताजनक आहे.
• पाणी साठा आणि संवर्धनाच्या उपाययोजना राबवाव्यात
• शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करावे
• उष्माघाताच्या दृष्टीने थंड निवारा केंद्रे सुरू ठेवावीत
• पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी
• आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी