PM Modi Japanese PM Meet : 'ती माझी लहान बहीण...'; पीएम मोदींकडून जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे भावूक स्वागत

भारत-जपानमध्ये 'AI' सह अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षरी
PM Modi Japanese PM Meet : 'ती माझी लहान बहीण...'; पीएम मोदींकडून जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे भावूक स्वागत
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांमध्ये आज एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळाला. १६ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाईची यांचे स्वागत करताना, त्यांचा उल्लेख अत्यंत आपुलकीने 'माझी लहान बहीण' असा केला.

हैदराबाद हाऊसमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक भेटीत केवळ भावनिक बंधच जोडले गेले नाहीत, तर दोन्ही देशांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI), संरक्षण, सेमीकंडक्टर्स आणि अपारंपरिक ऊर्जा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. भारत आणि जपानमधील हा सामायिक बौद्ध वारसा आणि दृढ होत चाललेली मैत्री संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू करणारी ठरेल, असा विश्वास दोन्ही देशांच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पंतप्रधान साने ताकाईची यांच्या पहिल्या भारत भेटीवर, भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी त्यांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून एक दूरदर्शी आणि लोकप्रिय नेत्या आहेत. विशेष म्हणजे, त्या जपानच्या 'नारा' प्रांतातून येतात, जे भारत आणि जपानमधील सामायिक बौद्ध वारशाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे."

जिव्हाळ्याचा हाच धागा पकडत पीएम मोदी पुढे म्हणाले की, ‘‘जपानच्या पंतप्रधान आणि माझी लहान बहीण, पंतप्रधान ताकाईची, दोन्ही देशांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे सदस्य – नमस्कार. भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान साने ताकाईची यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे.’’

दोन्ही देशांमधील वाढत्या आर्थिक भागीदारीवर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘‘आज भारत आणि जपान या दोन्ही अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणल्या जातात. गेल्या वर्षभरात दोन्ही देशांत १२० नवीन व्यावसायिक करार झाले असून, याद्वारे भारतात १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त जपानी गुंतवणूक येणार आहे. पुढील दशकात जपानमधून भारतात १० ट्रिलियन येनची गुंतवणूक आकर्षित करणे आणि जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट करणे हे आमचे लक्ष्य आहे.’’

या परिषदेत तंत्रज्ञान आणि अपारंपरिक ऊर्जेवर विशेष भर देण्यात आला. या अंतर्गत संपूर्ण भारतात १,००० बायोगॅस आणि सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्यासाठी 'भारत-जपान बायोगॅस उपक्रमा'ची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधान साने ताकाईची यांचे औपचारिक आणि दिमाखदार स्वागत करण्यात आले. बदलत्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देश आपली 'विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी' अधिक मजबूत करत आहेत. जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची १ ते ३ जुलै दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून, दोन्ही देशांमधील हा नवा संवाद इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news