

नवी दिल्ली : ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. सय्यद अब्बास अराघची यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीनंतर सोशल मीडियावर व्यक्त होत डॉ. अराघची म्हणाले की, एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या प्रादेशिक घडामोडींवर चांगली चर्चा झाली.
होर्मूझ सामुद्रधुनीतील सुरक्षेचा रक्षक म्हणून इराण आपली ऐतिहासिक जबाबदारी कायम पार पाडत राहील, तसेच इराण हा सर्व मित्र राष्ट्रांचा विश्वासार्ह भागीदार असून व्यापारी व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत आमच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो,” असेही इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची म्हणाले. राजधानी दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीत प्रादेशिक स्थैर्य, बहुपक्षीय सहकार्य आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे समजते. याआधी गुरुवारी अराघची यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान झालेल्या या उच्चस्तरीय भेटींकडे भारत-इराण संबंधांमधील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स मंचाचे वाढते सामरिक महत्त्व या बैठकीत अधोरेखित झाले.
दरम्यान, ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना अराघची यांनी अमेरिकेच्या दबाव आणि दादागिरीच्या धोरणांवर टीका केली. “अमेरिकेकडून होणाऱ्या दबाव आणि सक्तीच्या धोरणांचा अनुभव या सभागृहातील अनेक देशांना आहे. अशा पद्धतींना इतिहासजमा करण्याची वेळ आली आहे. आज आपले देश पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले आहेत. आपण सर्वजण एका समान आणि गंभीर आव्हानाचा सामना करत आहोत. इतिहास सांगतो की, अस्ताला जाणारी साम्राज्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जातात,” असेही ते म्हणाले.