

नवी दिल्ली: इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी आवश्यक लिथियम आधारित उत्पादनांवर आपल्याला एकाच देशावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी संपूर्ण भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक वाहन तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
एका मोबिलिटीच्या सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणीवस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया आणि एका मोबिलिटीचे चेअरमन सुधीर मेहता यावेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, भारत २२ लाख कोटी रुपयांची इंधनाची आयात करतो. देशाच्या गरजेच्या ८७ टक्के इंधन आयात करावे लागते. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. इंधन आयात कमी झाल्यास त्याप्रमाणात पैसा भारतीय अर्थव्यवस्थेत जिरेल. त्याचा अर्थगतीच्या वाढीला फायदा होईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या लिथियमची ३० ते ४० आयात एकाच देशाकडून (चीन) केली जाते. आत्मनिर्भर भारतासाठी हे अवलंबित्व आपल्याला मोडीत काढायचे आहे. जम्मू आणि काश्मीर येथे लिथियमचा जगातील एकूण साठ्याच्या सहा टक्के साठा सापडला आहे. त्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण भारतीय बनावटीची ईव्ही तयार करायची आहे.
वाहनक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अमेरिका (७९ लाख कोटी रुपये), चीन (४९ लाख कोटी) नंतर भारताचे वाहनक्षेत्र (२२ लाख कोटी) तिसऱ्या क्रमांकावर येते. राज्य व भारत सरकारला सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) याच क्षेत्रातून मिळतो. याशिवाय साडेचार कोटी रोजगार देणारे आणि निर्यातीत सर्वाधिक योगदान देणारे क्षेत्र म्हणून याचा सामावेश होतो, असे गडकरी म्हणाले.
ईव्हीची मागणी महाराष्ट्र पूर्ण करेल: देवेंद्र फडणवीस
आज भारताच्या अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक दबाव इंधन आयातीचा. त्याचे प्रमाण कमी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणी रोखू शकणार नाही. म्हणून इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यायी इंधनाला प्रोत्साहन दिले जात आहे. ईव्हीची मागणी वाढत असून, त्याची पूर्तता मेक इन महाराष्ट्र करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.