

टोरांटो; वृत्तसंस्था : कॅनडाच्या फेडरल सरकारने आपल्या भूमिकेत महत्त्वपूर्ण बदल करत भारताचा कॅनडातील हिंसक घटनांशी सध्या कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौर्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका वरिष्ठ अधिकार्याने ही माहिती दिली. मार्क कार्नी यांचा चार दिवसांचा भारत दौरा शुक्रवारपासून सुरू होत असून, ते मुंबई आणि नवी दिल्ली येथे भेट देणार आहेत. नवी दिल्लीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. कॅनडाकडून अधिक व्यावहारिक परराष्ट्र धोरण अवलंबत भारताशी आर्थिक संबंध अधिक द़ृढ करण्याचा प्रयत्न या दौर्यामागे असल्याचे मानले जात आहे.
जून 2023 मध्ये कोलंबियामध्ये गुरुद्वाराबाहेर खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या झाली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या प्रकरणात भारत सरकारच्या एजंटांचा संबंध असल्याचे विश्वसनीय पुरावे असल्याचा दावा केला होता. नवी दिल्लीने हे आरोप फेटाळले होते. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला. परस्पर राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
अलीकडील पत्रकार परिषदेत वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांदरम्यान सातत्याने संपर्क सुरू असून, सध्या भारताशी संबंधित कोणतीही हिंसक किंवा परकीय हस्तक्षेपाची कारवाई सुरू नसल्याचा त्यांना विश्वास आहे. ‘जर अशा कारवाया सुरू असत्या, तर आम्ही हा दौरा केला नसता,’ असेही अधिकार्यांनी नमूद केले.
* कॅनडाने भारताचा सध्याच्या हिंसक घटनांशी संबंध नसल्याचे म्हटले
* मार्क कार्नी भारत दौर्यावर; मोदींसोबत भेट निश्चित
* निज्जर हत्येनंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव वाढला होता
* कॅनडाकडून आता अधिक व्यावहारिक आणि सकारात्मक भूमिकेचे संकेत