Algae Tree : हवेतील प्रदूषणाला आता ‌‘शेवाळ‌’ गिळणार!

भोपाळमध्ये देशातील पहिले ‌‘अल्गी ट्री‌’; एका यंत्रात २५ झाडांचे सामर्थ्य
Algae Tree
हवेतील प्रदूषणाला आता ‌‘शेवाळ‌’ गिळणार!
Published on
Updated on

भोपाळ : हवेच्या अक्राळविक्राळ प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भोपाळमधील मशरूम वर्ल्ड ग्रुपने एक अफलातून प्रयोग केला आहे. प्रदूषणाला गिळंकृत करण्यासाठी चक्क शेवाळयुक्त रोपट्यांचे यंत्र उभारले आहे. वाचायला थोडे नवल वाटेल; पण भोपाळमध्ये देशातील पहिले ‌‘अल्गी ट्री‌’ उभारण्यात आले आहे. शेवाळाच्या या स्मार्ट झाडामध्ये एकाच वेळी तब्बल २५ डेरेदार वृक्षांइतका कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे.

मशरूम वर्ल्ड ग्रुपच्या ५० पेक्षा अधिक तज्ज्ञांनी दोन वर्षांच्या संशोधनानंतर हे उपकरण विकसित केले आहे. हे ‌‘अल्गी ट्री‌’ म्हणजे नैसर्गिक झाड नसून, सूक्ष्म शेवाळाच्या मदतीने हवा शुद्ध करणारे एक ‌‘स्मार्ट डिव्हाईस‌’ आहे. हे यंत्र दरवर्षी सुमारे १.५ टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि त्या बदल्यात १ टन ऑक्सिजनची निर्मिती करते.

भोपाळमधील स्वामी विवेकानंद उद्यानात या अत्याधुनिक युनिटचे उद्‌घाटन कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान नैसर्गिक वृक्षांना पर्याय नसून, त्यांना पूरक म्हणून काम करेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले.

गर्दीच्या ठिकाणी अतिसूक्ष्म धूलिकण कमी करते

शहरांमधील गर्दीच्या ठिकाणी आणि जिथे पारंपरिक वृक्षारोपण करणे कठीण आहे, अशा भागांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. हे यंत्र १५ मीटरच्या परिघात घातक ‌‘पीएम २.५‌’ कणांचे प्रमाण ४५ ते ५५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सक्षम आहे.

झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करते ‌‘अल्गी ट्री‌’‌

‘अल्गी ट्री‌’ हे एक अत्याधुनिक बायो-टेक्नॉलॉजी यंत्र आहे. जे नैसर्गिक झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करण्याचे काम करते. हे यंत्र म्हणजे प्रत्यक्षात एक मोठी काचेची टाकी असून, त्यात पाणी आणि लाखो जिवंत सूक्ष्म शेवाळ (मायक्रो अल्गी) भरलेले आहेत. हे सौरऊर्जेवर चालणारे युनिट आहे. ज्याच्या वरच्या बाजूला सोलर पॅनेल आणि आतमध्ये पंप व सेन्सर्स बसवलेले असतात. हे यंत्र वातावरणातील प्रदूषित हवा आत खेचून घेते आणि त्यातील शेवाळ सूर्यप्रकाशाच्या मदतीने प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणतात. या प्रक्रियेद्वारे ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन बाहेर सोडतात.

  • दोन वर्षांच्या संशोधनानंतर सौरऊर्जेवर चालणारे तंत्रज्ञान विकसित

  • यंत्र दरवर्षी १.५ टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, तर १ टन ऑक्सिजनची निर्मिती करते

  • ‘अल्गी ट्री‌’ १५ मीटर परिसरातील धूलिकणांचे प्रमाण ४५ ते ५५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सक्षम

  • पारंपरिक वृक्षारोपण शक्य नसलेल्या गर्दीच्या शहरी भागांसाठी तंत्रज्ञान प्रभावी पर्याय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news