

छत्रपती संभाजीनगर : लहान बाळांचे लसीकरण सुरू असताना एका महिलेने तिच्या बाळाला पाच पैकी दोनच डोस घेतल्यानंतर नकार देत आशा वर्करला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी दीडच्या सुमारास साहस सोसायटी येथील अष्टविनायक मंदिरात घडली. शालिनी विकास रोकडे (रा. साईनगर) असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
फिर्यादी आशा वर्कर पूजा रुपेश दहिटे (३०, रा. विजयनगर) यांच्या तक्रारीनुसार, विजय नगर येथील साहस सोसायटीमध्ये लहान बाळांना लसीकरण सुरू होते. तिथे आरोपी शालिनी रोकडे तिच्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन आली. बाळाला पाच लास द्यायचे होते. त्यातील दोन लस तोंडातून पाजायचे तर तीन टोचायचे होते. शालिनीने दोन तोंडातून पाजायचे व एक टोचायची लस तिच्या बाळाला घेतली. पुढील डोस घेण्यास नकार दिला. तिला सिस्टर अर्चना राठोड यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असतात असे सांगण्याचा प्रयत्न केला.तिने राठोड यांना तुम्ही जास्त बोलू नका मला माझ्या बाळाला लस द्यायची नाही असे म्हणत मारहाणीची धमकी दिली. त्यानंतर पूजा दोन लस न दिल्याने लसीकरण कार्डवरील तारीख कट करत असताना शालिनीने त्यांच्या पाठीमागून येथून केस पकडून मारहाण केली. पूजा यांच्या सोबतच्या आशा वर्कर यांनी तिच्या तावडीतून पूजा यांना सोडविले. मात्र, त्यानंतरही शालिनी शिवीगाळ करून निघून गेली.
या प्रकारामुळे आशा वर्कर पूजा यांनी लसीकरणाच्या शासकीय कामात शालिनी रोकडे हिने अडथळा आणून ते बंद पाडले अशी तक्रार दिली. त्यावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.