

India Energy Crisis LPG Shortage: केंद्र सरकारनं आज (मंगळवार दि. १७ मार्च) पत्रकार परिषदेत भारतातील ऊर्जा संकट हे अजूनही काळीचा विषय आहे. अजूनही मध्य पूर्व आशियातील परिस्थिती सुधारलेली नाही. मात्र असं असलं तरी LPG पुरवठ्याबाबत लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही असं सांगितलं.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या सह सचिव सुजाता शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील एलपीजी आणि पेट्रोल पुरवठ्याबाबत माहिती दिली. त्यांनी एलपीजी गॅसचा वापर काटकरसीने करा आणि अन्न शिजवण्यासाठी पर्यायी इंधनाचा देखील करा असा सल्ला दिला.
पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, 'एलपीजीच्या बाबतीत मी हे सांगू इच्छिते की अजूनही हा विषय काळजीचा आहे. सध्याच्या घडीला जरी कोणत्याही पुरवठादाराकडील साठा संपूर्णपणे संपलेला नसला तरी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या पुढे म्हणाल्या की घरगुती वापराचा एलपीजी पुरवाठा आणि सिलिंडर हा पूर्वीसारखाच असणार आहे.
सुजाता शर्मा यांनी ऑनलाईन सिलिंडर बुकिंगबाबतीत सांगितलं की, ऑनलाईन गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. आजच्या घडीला जवळपास ९४ टक्के गॅस सिलिंडर ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग होत आहेत. याचबरोबर डिलिव्हरी ऑथेंटिफिकेशन कोड सिस्टममध्ये देखील चांगली सुधारणा झाली आहे. जवळपास ७६ टक्के लोकांना तो पहतच आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरबाबत बोलायचं झालं तर आधी याचे वितरण पूर्णपणे थांबवलं होतं. मात्र आम्ही आता काही प्रमाणात ते रिस्टोर करत आहे.'
त्या पुढे म्हणाल्या की, 'बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीचे वितरण करणं सुरू केलं आहे. पेट्रोल आणि डिझेल बाबत बोलायचं झालं तर ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक गॅस बद्दल बोलायचं झालं तर मी सांगितल्याप्रमाणे भारत सरकार यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र ज्यावेळी सर्व व्यावसायिक एलपीजी ग्राहक हे पीएनजी गॅसकडे शिफ्ट होतील त्यावेळी या प्रयत्नांना अजून बळ मिळेल.
शर्मा यांनी जे गॅस सिलिंडरचा साठा करत आहेत आणि काळा बाजार करत आहेत त्यांना इशारा दिला आहे. त्यांनी काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध कडक पावलं उचलली जातील.
याच जोडीला केरोसीन आणि कोळसा यासारखे पर्यायी इंधन देखील काही क्षेत्रांसाठी अॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. यात हॉस्पिटॅलिटी आणि रेस्तराँचा देखील समावेश आहे. यामुळं एलपीजी पुरवठ्यावरील ताण काहीसा कमी होणार आहे.