

Dhvani Missile
नवी दिल्ली: भारताने ब्रह्मोसपेक्षाही ‘महाभयंकर' क्षेपणास्त्र तयार केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे नवे तळही थेट टप्प्यात येणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता ‘ध्वनी’ नावाच्या नवीन पिढीच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहे. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक वेगवान आणि दूर पल्ल्याचे आहे.
२०२५ च्या अखेरीस या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी होण्याची शक्यता आहे. ‘ध्वनी’ क्षेपणास्त्रात सुमारे ७,४०० किलोमीटर प्रति तास या वेगाने उड्डाण करण्याची क्षमता असेल. आवाजाच्या गतीपेक्षा सहा पटींहून अधिक असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला बचाव करण्यासाठी वेळच मिळणार नाही.
‘ध्वनी’ हे हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
कमाल वेग: ७,४०० किमी/तास.
मारक क्षमता : सुमारे १,५०० किलोमीटरपर्यंत.
हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवेतूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.
ब्रह्मोस हे भारत-रशियाचे संयुक्त क्षेपणास्त्र आहे, जे ३७०४ किमी/तास वेगाने २९०-६०० किलोमीटरपर्यंत हल्ला करते. ते सु-३०एमकेआय विमाने आणि आयएनएस विक्रांत सारख्या जहाजांवर बसवलेले आहे. मात्र 'ध्वनी' मॅक ५ पेक्षा जास्त वेगाने उडते, जे अवघ्या १० मिनिटांत दूरच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते. डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञांनी सांगितले की, ब्रह्मोस अचूक आहे, पण 'ध्वनी' अदृश्यपणे लक्ष्यावर पोहोचते.
'ध्वनी' यशस्वी झाल्यास, भारत अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या निवडक देशांच्या यादीत सामील होईल. हायपरसोनिक शस्त्रे शत्रूसाठी प्रत्युत्तर देण्याकरीता कठीण बनवतात. अफगाणिस्तान सीमेजवळ जिथे पाकिस्तान नवीन दहशतवादी तळ उभारत आहे, तो भागही 'ध्वनी'च्या टप्प्यात येईल. चीनच्या डीएफ-१७ आणि रशियाच्या अवनगार्ड सारख्या क्षेपणास्त्रांविरुद्ध 'ध्वनी' भारताचे संरक्षण मजबूत करेल.