

नवी दिल्ली : बोगदा, मेट्रोल रेल्वे आणि विविध पायाभूत सुविधांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टनेल बोरिंग मशिनवर (टीबीएम) चीनने निर्बंध घातल्याने भारतातील पायाभूत सुविधांची उभारणी संकटात सापडली होती. त्यामुळे भारताने स्वतःची टीबीएम तयार केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
वैष्णव यांनी १६ बोगद्यांचा समावेश असलेल्या १२५ किमी लांबीच्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाच्या प्रगतीची आणि सद्य:स्थितीची माहिती दिली. पूर्वी टीबीएमसाठी आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. आता ८ मीटर आणि १५ मीटर व्यासाची यंत्रे स्वतः तयार कत आहोत. इतकेच नव्हे, तर देश आता १६ मीटरपेक्षा जास्त व्यासाची यंत्रे तयार करण्याचीही तयारी करत आहे. यामुळे रेल्वे, महामार्ग आणि ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या या तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताची देशांतर्गत क्षमता अधिक बळकट होत आहे, असे ते म्हणाले. वैष्णव यांनी ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पातील अभियांत्रिकी आव्हाने आणि डिझाईन, निर्मितीपासून ते देखभालीपर्यंत टीबीएमची संपूर्ण परिसंस्था (इकोसिस्टीम) देशांतर्गत विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.