India - China Relations | सरकारने भारत-चीन संबंधांवर संसदेत चर्चेस सहमती दर्शवावी: काँग्रेस
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने संसदेत भारत-चीन संबंधांवर चर्चा करण्यास सहमती दर्शवावी. यामुळे भारतासमोरील आव्हानांना सामूहिक प्रतिसाद देण्यासाठी एकमत निर्माण करता येईल, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे ऑपरेशन सिंदूर अचानक थांबवण्यात आल्यापासून ज्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्याची अधिकृतपणे पुष्टी झाली आहे. चीनने पाकिस्तानी हवाई दलाला मदत केली त्याची काही माहिती लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी उघड केली आहे. हा तोच चीन आहे ज्याने पाच वर्षांपूर्वी लडाखमधील यथास्थिती पूर्णपणे नष्ट केली होती. पण पंतप्रधान मोदींनी १९ जून २०२० रोजी चीनला सार्वजनिक क्लीन चिट दिली होती, असे जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.
पाच वर्षांपासून, काँग्रेस संसदेत भारत-चीन संबंधांच्या संपूर्ण व्याप्तीवर चर्चा करण्याची मागणी करत आहे. मोदी सरकारने अशी चर्चा करण्यास सातत्याने नकार दिला आहे. २१ जुलै २०२५ रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस ही मागणी करत राहील, असे ते म्हणाले. मोदी सरकारने किमान आता तरी चर्चेस सहमती दर्शविली पाहिजे. यामुळे चीनने भारतासमोर उभ्या केलेल्या भू-राजकीय आणि आर्थिक आव्हानांना सामूहिक प्रतिसाद देण्यासाठी एकमत निर्माण करता येईल.

