

Ashwini Vaishnaw on bullet train
नवी दिल्ली: येत्या काळात बुलेट ट्रेनच्या विस्तारामुळे देशांतर्गत विमान सेवांना, विशेषतः कमी अंतराच्या प्रवासासाठी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. "बुलेट ट्रेनमुळे भविष्यात कमी अंतराची विमान सेवा संपुष्टात येईल," असे सूचक विधान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी (दि. ११) केले आहे. मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवासाचा वेळ कमी होऊन केवळ ४८ मिनिटांवर येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रवासाचा नकाशा पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सोमवारी 'सीआयआय' वार्षिक व्यापार शिखर परिषद २०२६ मध्ये बोलताना वैष्णव यांनी हाय-स्पीड रेल्वेचे महत्त्व सांगितले. ज्याप्रमाणे एकेकाळी 'बजेट एअरलाईन्स'ने रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या प्रवासाला मागे टाकले होते, अगदी तसाच परिणाम आता बुलेट ट्रेनमुळे विमान क्षेत्रावर होणार आहे. कमी वेळेत आणि सुलभ प्रवासामुळे विमान प्रवास धीमा, महागडा आणि काहीसा अनावश्यक वाटू लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.
रेल्वे मंत्र्यांनी सादर केलेल्या आराखड्यानुसार, प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. त्यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवासाचा वेळ कमी होऊन केवळ ४८ मिनिटांवर येईल. तर पुणे-हैदराबाद प्रवासाला १ तास ५५ मिनिटे, हैदराबाद-बंगळुरू प्रवासाला २ तास ८ मिनिटे, चेन्नई-हैदराबाद प्रवासाला २ तास ५५ मिनिटे आणि बंगळुरू-चेन्नई प्रवासाला केवळ ७८ मिनिटे लागतील.
वैष्णव यांनी विमान कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे आगामी अति-जलद रेल्वे जाळे अनेक व्यस्त आणि अल्प-अंतराच्या मार्गांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल, ज्यामुळे विमान कंपन्यांना स्पर्धेसाठी फारशी संधीच उरणार नाही. त्यामुळे मुंबई-पुणे, हैदराबाद-बेंगळुरू आणि बेंगळुरू-चेन्नई यांसारख्या मार्गांवर विमान वाहतुकीवर गुंतवणूकदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. अशा मार्गांवर ९९ टक्के वर्चस्व हे रेल्वेचेच असेल, असे ते म्हणाले. जपानमधील टोकियो, नागोया, क्योटो आणि ओसाका यांना जोडणाऱ्या मार्गांवर, तसेच चीन आणि दक्षिण कोरियामधील प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारचे बदल यापूर्वीच घडून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
वैष्णव यांनी सांगितले की, भारत बुलेट ट्रेन कॉरिडॉर्सवर जवळपास १६ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे आणि यातील जवळपास संपूर्ण रक्कम ही भारतीय कंत्राटदार व पुरवठादारांकडेच जाईल. आगामी कॉरिडॉर्ससाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकल्पांची अंमलबजावणी भारतात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या वेगाने केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
विमानतळांच्या तुलनेत बुलेट ट्रेनचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची स्थानके शहराच्या मध्यवर्ती भागात असतील. विमानाने प्रवास करताना विमानतळावर पोहोचणे, सुरक्षा तपासणी, सामानाची प्रक्रिया यासाठी लागणारा वेळ विचारात घेता, 'डोअर-टू-डोअर' प्रवासाच्या बाबतीत बुलेट ट्रेन विमानांना सहज मात देऊ शकते. व्यावसायिक प्रवाशांसाठी ही वेळ वाचवणारी सेवा अधिक सोयीची ठरेल. सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू असून, त्यानंतर मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद आणि बेंगळुरू-चेन्नई यांसारख्या गर्दीच्या मार्गांना प्राधान्य दिले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारताच्या दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे.