India-Bangladesh : भारत-बांगलादेश दरम्यान 10 महत्त्वाचे करार

सागरी क्षेत्रातील संबंधांना प्रोत्साहन देण्‍यावर भर
India- Bangladesh bilateral ties
भारत आणि बांगलादेश दरम्‍यान आज महत्त्‍वाचे दहा करार झाले. ANI Photo

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि बांगलादेश दरम्‍यान आज सागरी क्षेत्रातील संबंधांना प्रोत्साहन देणे आणि ब्लू इकॉनॉमी यासह १० महत्त्‍वाचे करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात व्यापक चर्चेनंतर करारांना अंतिम रूप देण्यात आले.

भारत आणि बांगलादेशमध्‍ये झालेल्‍या करारांमध्‍ये डिजिटल भागीदारी, हरित भागीदारी, सागरी सहकार्य, समुद्रावर आधारित अर्थव्यवस्था, अंतराळ क्षेत्रात सहकार्य, रेल्वे कनेक्टिव्हिटी, सागरी संशोधन, सुरक्षेत परस्पर सहकार्य, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्यपालनावरील आदी करारांचा समावेश आहे.

दोन्‍ही देशांमधील तरुणाईला होणार फायदा : पंतप्रधान मोदी

करारांनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, 'आज आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भविष्यातील दृष्टीकोन तयार केला आहे. पर्यावरणपूरक भागीदारी, डिजिटल भागीदारी, महासागर आधारित अर्थव्यवस्था आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर झालेल्या सहमतीचा फायदा दोन्ही देशांच्या तरुणांना होईल, असा विश्‍वासही पंतप्रधान मोदींनी व्‍यक्‍त केला.

भारत बांगला देशचा विश्‍वासू मित्र : पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशच्‍या पंतप्रधान शेख हसीना म्‍हणाल्‍या की, 'भारत हा आपला मुख्य शेजारी, विश्वासू मित्र आणि प्रादेशिक भागीदार आहे. 1971 च्या मुक्तिसंग्रामापासून सुरू झालेल्या भारतासोबतच्या संबंधांना बांगलादेश खूप महत्त्व देतो.

'बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारत सरकार आणि भारतीय लोकांचे योगदान मला कृतज्ञतेने आठवते.' १९७१ च्या युद्धात बलिदान देणाऱ्या भारताच्या शूर शहीदांनाही शेख हसीना यांनी श्रद्धांजली वाहिली. आज आम्‍ही दोन्‍ही देशांमधील सुरक्षा, व्यापार, कनेक्टिव्हिटी, समान नदीचे पाणी वाटप, ऊर्जा आणि ऊर्जा आणि प्रादेशिक आणि बहुपक्षीय सहकार्य या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर चर्चा केली, असेही त्‍यांनी सांगितले.

बांगला देशातील नागरिकांना वैद्यकीय ई-व्हिसा सुविधा

भारताने बांगलादेशातील नागरिकांना वैद्यकीय ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यासाठी भारत सरकार बांगलादेशातील रंगपूर येथे उप उच्चायुक्तालय उघडणार आहे. याशिवाय, तिस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी तांत्रिक टीम पाठवण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

शेख हसीना महिनाभरात दुसऱ्यांदा भारतात आल्या

बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर शुक्रवारी भारतात पोहोचल्या. लोकसभा निवडणुकीनंतर भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर परदेशी नेत्याचा हा पहिलाच द्विपक्षीय राज्य दौरा आहे. शनिवारी सकाळी शेख हसीना यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. बैठकीपूर्वी एका शानदार समारंभात बांगलादेशच्या पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. 9 जून रोजी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात सहभागी झालेल्या सात प्रमुख नेत्यांमध्ये शेख हसीना यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news