INDIA Bloc Rally in Delhi: ४,००० पोलीस आणि २०० सीसीटीव्ही: 'इंडिया' आघाडीच्या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांचा तगडा बंदोबस्त

आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
Delhi Police
Delhi PoliceFile Photo
Published on: 
Updated on: 

INDIA Bloc Rally in Delhi

नवी दिल्ली : आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 'इंडिया' आघाडीने या रॅलीला १० लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा केला असला, तरी दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर अहवालानुसार सुमारे ७० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर विशेष लक्ष

दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि विशेष पोलीस आयुक्त देवेश चंद्र श्रीवास्तव यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रामलीला मैदानाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुरक्षेच्या तयारीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. संशयास्पद व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर विशेष सतर्कता बाळगण्यात येणार आहे.

Delhi Police
Rahul Gandhi : 'टाटा समूहाचा गुन्हेगारी पद्धतीने विनाश केला जातोय': राहुल गांधींचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

रामलीला मैदानाचे १४ झोनमध्ये विभाजन

सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली पोलिसांनी मैदानाचे १४ झोनमध्ये विभाजन केले आहे. सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी सुमारे ४,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रामलीला मैदानाच्या प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले असून, सुरक्षा तपासणीनंतरच नागरिकांना मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त १५० वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

आज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या रॅलीदरम्यान वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवतील. प्रत्येक झोनची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असेल, तर अतिरिक्त पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी प्रत्येकी दोन झोनच्या सुरक्षेवर देखरेख ठेवतील.

२०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत

मैदान आणि परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच पोलिसांच्या अंगावर लावण्यात येणारे बॉडी कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने परिस्थिती हाताळण्यासाठी दंगलविरोधी वाहने आणि पाळत ठेवण्याची उपकरणे असलेली पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आयोजकांवरही

दिल्ली पोलिसांनी आयोजकांना सुरक्षा उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मैदानातील मोक्याच्या ठिकाणी हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह त्यांच्या फुटेजवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, निमंत्रित व्यक्ती, स्वयंसेवक आणि रॅलीतील सहभागींच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसेसचा तपशीलही मागवण्यात आला आहे.

वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था निश्चित करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमस्थळी रात्री मुक्काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, आयोजकांना शिस्त पाळण्याचे आणि जातीय सलोखा बिघडू शकेल अशी भाषणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीएपीएफच्या २७० कंपन्या तैनात

सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसच्या (सीएपीएफ) २७० कंपन्या १६ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत तैनात राहणार आहेत. रॅली आणि विविध संघटनांकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्लीतील या २७० सीएपीएफ कंपन्यांच्या तैनातीचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवून १६ नोव्हेंबरपर्यंत केला आहे.

संभाव्य निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर या सुरक्षा दलांना महिन्याच्या सुरुवातीलाच दिल्लीत तैनात करण्यात आले होते. त्यांच्या तैनातीचे समन्वयन करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर सोपवण्यात आली आहे.

Delhi Police
Amit Shah: 'मत चोरी'च्या आरोपांवर चर्चेसाठी तयार : अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.