

INDIA Alliance Protest नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार इंडिया आघाडीने केला आहे. येत्या १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर दहा लाख लोकांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून, त्यासाठी गावागावांतून आणि तळागाळातून तयारी करण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आंदोलनाचा मुद्दा सोडायचा नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवाच्या काळात मोठे आंदोलन करण्याऐवजी स्थानिक पातळीवर आंदोलनाची धग कायम ठेवण्याच्या सूचना खासदार आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन सुरू ठेवत गावागावांत जनजागृती करावी आणि दिल्लीतील मोठ्या आंदोलनासाठी कार्यकर्ते व नागरिकांची जमवाजमव करावी, असे नियोजन आहे. पुढील २४ तासांत पदाधिकाऱ्यांना आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत सूचना दिल्या जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही आणि विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. कोणतेही समांतर आंदोलन होणार नसून, सर्व पक्ष एकत्रितपणे लढा पुढे नेतील, असे स्पष्ट करण्यात आले. काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि विद्यार्थी संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याने त्यांची ताकद एकत्र आणण्यावर भर दिला जाणार आहे. नवरात्र उत्सवात स्थानिक पातळीवरील आंदोलन सुरू ठेवून १ नोव्हेंबरच्या दिल्लीतील शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्याचे नियोजन आहे. रामलीला मैदानावर दहा लाख लोकांना एकत्र आणण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर तयारी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.