

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: 'एक राष्ट्र, एक निवडणूक' च्या (One Nation One Election) प्रस्तावाला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर देशभरातून राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काँगेस सह इंडिया आघाडीतील पक्षांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. तर एनडीएतील घटक पक्षांसह मायावती यांच्या बसपाने या निर्णयाचे स्वागत केले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमचा (One Nation One Election) या निर्णयाला विरोध असून लोकशाही टिकून राहण्यासाठी जेव्हा गरज असेल. तेव्हा निवडणुका घ्याव्या लागतात. 'एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाहीत कामाची नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, हा प्रस्ताव व्यावहारिक नाही. भाजपला सध्याच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला.
इंडिया आघाडीतील आम आदमी पक्षाने 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाचा विरोध केला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे निवडणूक आयोगाला शक्य नाही. जर निवडणूक आयोग महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घेऊ शकत नसेल, तर 'एक देश एक निवडणूक' कसे करू शकणार? असा सवाल आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी केला. कोणतेही सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही, तर भाजपला राष्ट्रपती राजवटीत राज्य करायचे आहे का? असे ते म्हणाले.
लालू प्रसाद यादव यांच्या राजदने या प्रस्तावाचा विरोध केला. राजद खासदार मनोज झा म्हणाले की, एक देश एक निवडणूक अवलंबल्यानंतर एखादे राज्य सरकार भंग झाले. तर तुम्ही काय करणार आहात का पुढच्या निवडणुकीपर्यंत राज्यपालांच्या माध्यमातून सरकार चालवणार? असा सवाल त्यांनी केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, आमच्या पक्षाने या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे. पण, एवढ्या मोठ्या स्तरावर निवडणुकांचे व्यवस्थापन आणि तेही एकाच वेळी, सामान्य जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोगाने याबाबत विचार केला पाहिजे. जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले की, एक देश एक निवडणूक या निर्णयाचे आमचा पक्ष समर्थन करतो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) या निर्णयाचे स्वागत केले. नरेंद्र मोदी यांनी देशहिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी एक्स वर पोस्ट करुन त्यांचे अभिनंदन केले. तसेच बसपा प्रमुख मायावती यांनी एक्स वर पोस्ट करून या प्रस्तावाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की एक देश, एक निवडणूक या प्रणाली अंतर्गत देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला आमच्या पक्षाची भूमिका सकारात्मक आहे. परंतु त्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताचे असले पाहिजे.