

Independence Day 2026 PM Modi Speech Red Fort
नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. सलग १३ व्या वर्षी त्यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून राष्ट्राला संदेश दिला. यासह भारताच्या संसदीय इतिहासात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ही कामगिरी करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
२०१४ मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले आहे. यंदाचे त्यांचे हे सलग १३ वे स्वातंत्र्यदिनाचे भाषण ठरले. या कामगिरीमुळे त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मागे टाकले आहे. इंदिरा गांधी यांनी १९६६ ते १९७६ या काळात सलग ११ वेळा स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केले होते.
भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळा स्वातंत्र्यदिनाचे भाषण देण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. नेहरू यांनी १९४७ ते १९६३ या कालावधीत सलग १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित केले होते.
दरम्यान, स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सुरुवात पारंपरिक उत्साह आणि दिमाखात झाली. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला. ध्वजारोहणानंतर सैन्याकडून २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले.
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असल्याचे सांगितले. डिजिटल क्रांती आणि नवसंशोधनाच्या जोरावर भारताने जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण केला असून, आगामी काळात 'मेड इन इंडिया ६जी' आणि सेमीकंडक्टर निर्मितीच्या जोरावर भारत या क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा नवा विश्वास त्यांनी व्यक्त केला.