

पुढारी ऑनलाईन डेस्क: Pariksha Pe Charcha 2025 Updates | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमातून सोमवारी (दि. १०) संवाद साधला. यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गज व्यतींनीदेखील विद्यार्थ्यांना 'परीक्षे पे चर्चा' या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले.
गेल्या आठ वर्षांपासून 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम केंद्र सरकारकडून राबवला जात आहे. 'परीक्षा पे चर्चा 2025' या कार्यक्रमात पीएम मोदींनी निसर्गाच्या सानिध्यात देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांशी खुलेपणाने संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटेवरील महत्त्वाच्या परीक्षेमधील अभ्यास प्रक्रिया, अडचणी, ताणतणाव व्यवस्थापन आणि यश या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचा भाग असलेल्या विविध क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पोषण आणि आरोग्य तज्ज्ञ आणि लेखिका रुजुता दिवेकर यांनी परीक्षांदरम्यान आहार कसा असावा? याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, "जसे शाळेत वेगवेगळे विषय असतात तसे आपल्या आहारातदेखील विविधता असली पाहिजे".
"काही पदार्थ आहेत जे तुमचा ताणतणाव कमी करतात. यामध्ये शेंगदाणे, केळी आणि भात या तीन पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे या गोष्टी आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत,'' असेही आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी म्हटले आहे"
मॅक्रोबायोटिक पोषणतज्ज्ञ आणि लेखिका शोनाली साभरवाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, "घरगुती अन्न हे सर्वोत्तम आहे. तणाव कमी करण्यासाठी आहारात बाजरी आणि तांबूस रंगाचा तांदूळाचा समावेश करता येईल. बाजरी तुम्हाला सुमारे ८ तास पोटभर ठेवू शकते. तुमच्या अति इच्छा नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित जेवण घेणे फायद्याचे ठरते,'' असेही त्या म्हणाल्या."
'लेबल पडेगा इंडिया' या त्यांच्या उपक्रमाबद्दल, फूडफार्मर, आरोग्य आणि पोषण प्रभावक रेवंत हिमत्सिंगका म्हणतात, "आपण कोणत्या पदार्थांचे सेवन करतो आहोत हे जाणून घेणे हा या मागील हेतू आहे. जर भारतातील प्रत्येक व्यक्तीने लेबल्स वाचायला सुरुवात केली, तर त्यांना कळेल की ते काय खात आहेत. माझे ध्येय पुढील ५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आरोग्याचा समावेश करणे आहे,'' असेही त्या म्हणाल्या.