

नवी दिल्ली : लग्नाला नकार देताच त्याने हाती चाकू घेऊन तिचा पाठलाग सुरू केला. तरीही ती आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली म्हणून गळा कापून तिची निर्घृण हत्या केली. एखाद्या हिंदी चित्रपटातील थराराप्रमाणे अशा या घटनेने राजधानी दिल्ली हादरली आहे.
हत्या करण्यात आलेल्या २१ वर्षीय मॉडेलचे नाव मुस्कान असे आहे. यातील आरोपी आकिब ऊर्फ इम्रान हा पेशाने जिम ट्रेनर असून हत्येच्या घटनेनंतर तो फरारी झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी १७ पथके तयार केली आहेत. मुस्कानच्या भावाच्या म्हणण्यानुसार, आरोपी इम्रान आणि मुस्कान गेल्या दीड वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. इम्रान तिच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होता. परंतु, मुस्कानने त्याच्याशी बोलणे टाळून अंतर राखण्यास सुरुवात केली होती.
मुस्कानच्या या वागण्याचा राग मनात धरून इम्रानने मुस्कानची हत्या केली. संशयित आरोपी घटनेपूर्वी मुस्कानच्या घराच्या दिशेने जात असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. परिसरातील इतर कॅमेऱ्यांचीही पाहणी सुरू आहे. गुन्हे अन्वेषण आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने व पुरावे गोळा केले आहेत.