

नवी दिल्ली : यूपीआय (UPI) सेवा वापरण्याच्या पद्धतीत 1 ऑगस्ट 2025 पासून मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, UPI वापरासाठी काही महत्त्वाच्या सेवा मर्यादित केल्या जाणार आहेत. त्यामुळे PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या अॅप्स वापरणाऱ्यांना नवीन नियमांनुसार व्यवहार करावे लागणार आहेत.
NPCIने स्पष्ट केले आहे की, UPI नेटवर्कवरचा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत. यामध्ये बँकांनी व पेमेंट अॅप्सनी API (Application Programming Interface) विनंत्यांची गती व संख्येवर नियंत्रण ठेवणे बंधनकारक असेल. नियम न पाळल्यास संबंधित बँक किंवा अॅपवर NPCI कारवाई करू शकते.
ज्यांना दिवसातून अनेक वेळा बॅलन्स चेक करण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी नवीन मर्यादा लागू होणार आहेत. 1 ऑगस्टपासून एका दिवसात जास्तीत जास्त 50 वेळा बॅलन्स चेक करता येणार आहे. Ezeepay चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुशर्रफ हुसैन यांनी सांगितले की, “ही मर्यादा व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते, पण UPI नेटवर्क स्थिर ठेवण्यासाठी ही आवश्यकता होती.”
NPCI ने निर्देश दिले आहेत की, सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9:30 या पीक अवर्समध्ये बॅलन्स चेक आणि अन्य सेवा मर्यादित किंवा बंद केल्या जातील. याचवेळी प्रत्येक व्यवहारानंतर बँकेने ग्राहकांना बॅलन्सची माहिती द्यावी लागेल.
Netflix, SIP यांसारख्या सेवांसाठी UPI ऑटोपेचा वापर करणाऱ्यांसाठीही वेळेची मर्यादा ठरवण्यात आली आहे. आता केवळ नॉन-पीक अवर्समध्येच ऑटोरायझेशन आणि डेबिट प्रक्रिया होणार आहे. हे सर्व बदल UPI प्रणाली अधिक विश्वसनीय, सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी केले जात आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून नवीन नियमांसाठी यूपीआय (UPI) युजर्संनी सज्ज राहणे आवश्यक आहे.