पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी भारतीय अंतराळ मोहिमा चांद्रयान-4 आणि गगनयान विषयी माहिती दिली. शुक्रवारी (दि.२० सप्टेंबर) त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चांद्रयान-4 मोहिमेला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काही महिन्यांत मिशनबाबत नवीन गोष्टी पाहायला मिळू शकतात. यासोबतच आतापर्यंत तांत्रिक बाबींचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. याला मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळाली आहे. या मिशनमध्ये अनेक टप्पे असणार आहेत, ज्यांना कॅबिनेटची मंजुरी आवश्यक असल्याचेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
अंतराळ कार्यक्रमाला चालना देण्यासाठी, सरकारने चंद्राचे खडक पृथ्वीवर परत आणण्यासाठी, शुक्र ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान पाठवण्यासाठी आणि भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी गगनयान प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी चंद्रयान-4 मोहिमेला बुधवारी मान्यता दिल्याचे डॉ. एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मीडियाशी बोलताना सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-4 चंद्रावर जाईल आणि तिथे सॉफ्ट लँडिंग करेल. मिशन पूर्ण केल्यानंतर ते पृथ्वीवरही परतणार आहे. अशा परिस्थितीत चांद्रयान-4 साठी पृथ्वीवर परतणे हे पूर्णपणे वेगळे मिशन आहे. चांद्रयान-३ फक्त चंद्रावर गेले आणि तिथे सॉफ्ट लँडिंग केले हे सर्वांनाच माहीत आहे. पण चांद्रयान-4 सोबत असे होणार नाही. त्याचा आकार चांद्रयान-3 पेक्षा दुप्पट असणार आहे. ज्यामध्ये पाच मॉड्यूलदेखील आहेत. यासोबतच चांद्रयान-4 दोनदा प्रक्षेपित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मिशन किचकट होऊ शकते, असेही सोमनाथ यांनी म्हटले आहे.
चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावरून 3-5 किलो माती आणि खडकाचे नमुने पृथ्वीवर घेऊन येणार असल्याचे देखील डॉ.एस सोमनाथ यानी सांगितले आहे. चांद्रयान-4 अंतराळ यानामध्ये पाच वेगवेगळे मॉड्यूल असतील, जे 2023 च्या चांद्रयानपेक्षा तीन अधिक मॉड्यूल आहेत, असेही इस्रो प्रमुख एस सोमनाथ म्हणाले.
गगनयान मोहिमेबाबत इस्रो प्रमुख म्हणाले की, हे मिशन प्रक्षेपणासाठी तयार करण्यात आले आहे. या वर्षभरात ते सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.