

Monsoon Update
मान्सून आज (दि. २९ जून) संपूर्ण देशभरात दाखल झाला आहे. यंदा मान्सूनने तब्बल ९ दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला आहे. दिल्लीसह देशाच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हिमाचलपासून केरळपर्यंत आणि उत्तराखंडपासून उत्तर प्रदेशपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. ४ जुलैपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाची अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनने आज राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा आणि संपूर्ण दिल्ली व्यापली आहे. आता संपूर्ण भारतभर मान्सून सक्रिय झाला आहे. ही प्रक्रिया सर्वसाधारण तारखेपेक्षा (८ जुलै) ९ दिवस आधीच पूर्ण झाली आहे.
हवामान विभागाने पुढे म्हटले आहे की, पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही स्थिती २९ जून २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजेपर्यंत कायम होती. या प्रणालीशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेली आहे. पुढील दोन दिवसांत ही प्रणाली हळूहळू उत्तर ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दिशेने सरकेल. त्यामुळे बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगालमधील विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अंदमान-निकोबार बेटे, किनारी कर्नाटक, महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे उत्तराखंड सरकारने आज चारधाम यात्रा एका दिवसासाठी स्थगित केली आहे. यात्रेकरूंची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडेय यांनी सध्याची हवामान परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.