पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. यानंतर भाजपने 'जामीनवाले मुख्यमंत्री' म्हणत केजरीवालांवर टीका केली. तसेच त्यांच्या राजकारणात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गौरव भाटिया म्हणाले की, केजरीवाल यांच्यावर दोन खटले सुरू आहेत. सीबीआय प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला आहे. दुसरे प्रकरण ईडीचे आहे. यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. गंभीर आरोप असल्यानंतर किंवा अशा प्रकरणांमध्ये नाव आले असताना नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र त्यांच्याकडून तीही अपेक्षा करता येत नाही. त्यांच्याकडे कुठलीही नैतिकता नाही, अशा शब्दात भाटिया यांनी केजरीवाल यांना फटकारले.
गौरव भाटिया म्हणाले की केजरीवाल भ्रष्ट आहेत, त्यांनी सहा महिने तुरुंगात काढले आहेत तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही. 'जेल सीएम आता बेल सीएम' झाले आहेत. केजरीवाल राजकारणात आल्यानंतर इतरांना नैतिकतेचा धडे देत होते. मात्र तेच केजरीवाल आता जामिनावर आहेत तसेच त्यांना नियम आणि अटींसह जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असेही गौरव भाटिया म्हणाले.