

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्यावर सध्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किडनीच्या आजाराने ग्रस्त असणार्या मलिक यांच्यावर ११ मेपासून उपचार सुरु आहेत. मागील काही दिवस ते सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा एक्सवर पोस्ट केली की, 'परिस्थिती खूप गंभीर आहे. संपर्क क्रमांक- ९६१०५४४९७२'. यापूर्वी काही तास आधी त्यांनी माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जगलो की नाही हे माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो, अशी पोस्ट केली होती.
सत्यपाल मलिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'नमस्कार मित्रांनो, मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीच्या समस्येचा त्रास आहे. काल सकाळपासून मी ठीक होतो पण आज पुन्हा मला आयसीयूमध्ये हलवावे लागले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जगलो की नाही हे माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो. मी राज्यपाल पदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देवू केली होती;पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी नेते दिवंगत चौधरी चरण सिंह यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो. त्यामुळे ते कधीही माझा विश्वास डळमळीत करू शकले नाहीत.
मी राज्यपाल असताना शेतकरी आंओदलन सुरु होते. मी कोणत्याही राजकीय लोभाशिवाय शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. यानंतर महिला कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते इंडिया गेट पर्यंतच्या केलेल्या आंदोलनातही मी त्यांच्यासोबत उभी राहिलो.मी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा उपस्थित केला, ज्याची चौकशी या सरकारने आजपर्यंत केलेली नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सीबीआयची भीती दाखवून सरकार मला खोट्या आरोपपत्रात अडकवण्यासाठी सबबी शोधल्या जात आहेत, असा आरोप करत आज मला ज्या निविदामध्ये अडकवू इच्छितात ती निविदा मी रद्द केली होती. याबाबत मी स्वतः पंतप्रधानांना या प्रकरणातील भ्रष्टाचार असल्याचे सांगितले होते. माझी राज्यपाल पदावरुन अन्यत्र बदली झाल्यानंतर संबंधित निविदा दुसर्याच्या स्वाक्षरीने करण्यात आले होते. मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही किंवा झुकणार नाही, असा निर्धारही सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने माझी बदनामी करण्यासाठी सर्व शक्ती वापरली आहे, शेवटी मी सरकार आणि सरकारी यंत्रणांना विनंती करतो की माझ्या प्रिय देशातील जनतेला सत्य सांगा की माझ्या चौकशीत तुम्हाला काय आढळले?, असा सवालही त्यांनी केला आहे. सत्य हे आहे की, ५० वर्षांहून अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत अत्यंत उच्च पदांवर देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आजही मी एका खोलीच्या घरात राहतो आणि कर्जबाजारीही आहे. जर आज माझ्याकडे संपत्ती असती तर मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल असलेल्या सत्यपाल मलिक यांची भेट घेतली आणि सत्याच्या लढाईत ते मलिक यांच्यासोबत उभे असल्याचे सांगितले. ते संध्याकाळी ५.३० वाजता रुग्णालयात पोहोचले आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काँग्रेस नेत्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही यावर चर्चा केली.