

Hyderabad Viral Video
हैदराबाद : येथील सफिलगुडा परिसरात रविवारी (दि. ११) २६ वर्षीय तरुणाने कट्टा माईसम्मा मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर मलमूत्र विसर्जन केले.या किसळवण्या कृत्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल होताच परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ भाजप आणि विविध हिंदू संघटनांनी मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर मलमूत्र विसर्जन केले. या किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने जमा होऊन आरोपीला बेदम चोप दिला. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी मंदिर परिसरात घोषणाबाजी करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
तेलंगणा भाजपचे अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी मंदिराला भेट दिली. भाविकांशी संवाद साधला. "आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा जुनाच बनाव पुन्हा रचला जात आहे. तेलंगणात गेल्या काही दिवसांत अशा ५-६ घटना घडल्या आहेत. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात आहे," असा आरोप राव यांनी केला.
राज्यातील काँग्रेस सरकार आणि बीआरएस पक्ष या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशा घटनांबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. "अशा गुन्हेगारांचे 'एन्काऊंटर' करणे किंवा त्यांना इतकी कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे की, पुन्हा कोणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही," असे धक्कादायक विधानही राव यांनी केले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नेरडमेट पोलिसांनी मंदिर परिसर आणि सफिलगुडा भागात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मलकाजगिरी झोनच्या पोलीस उपायुक्तांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपी अल्ताफ याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे का, याची तपासणी केली जात आहे. या घटनेमागे काही मोठे षडयंत्र आहे का, याचा तपास करण्यासाठी 'एसआयटी' (SIT) स्थापन करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त उपायुक्त पी. अशोक यांनी दिली.