

Boeing Dreamliner
हैदराबादला जाणाऱ्या लुफ्थांसा विमानाला हवेतच यू-टर्न घेऊन जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर माघारी परतावे लागले. या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती, यामुळे त्याला माघारी परतावे लागले, असे हैदराबाद विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
"हे विमान भारतीय हवाई हद्दीबाहेर असताना त्याला बॉम्बची धमकी मिळाली होती. यामुळे हे विमान ज्या ठिकाणाहून आले आहे तेथे त्याला परतावा लागले," असे अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
याआधी, लुफ्थांसाच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, विमानाला हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे हे विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे परतले. फ्रँकफर्ट हा जर्मनीतील सर्वात व्यस्त असलेला विमानतळ म्हणून ओळखला जातो. तसेच तो युरोपातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांत सहाव्या क्रमांकावर आहे.
लुफ्थांसा विमान LH752 फ्रँकफर्ट येथून रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१४ वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:४४ वाजता) निघाले होते. ते सोमवारी पहाटे हैदराबाद येथे पोहोचणार होते. दरम्यान, फ्लाइट ट्रॅकर डेटानुसार, त्याच्या प्रवासात काही तासांनी बदल झाला.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका प्रवाशाने सांगितले, "आता विमानतळाकडून आम्हाला रात्री राहण्याची व्यवस्था केली जात आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही उद्या सकाळी १० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १:३० वाजता) याच विमानाने प्रवास करु."
"आम्ही १५ मिनिटांपूर्वीच फ्रँकफर्टमध्ये परतलो आहोत. आम्हाला केवळ एवढेच सांगण्यात आले की हैदराबादमध्ये विमानाला उतरण्याची परवानगी दिली नाही," असे एका प्रवाशाने सांगितले. सदर प्रवासी अमेरिकेतून भारतात त्यांच्या आईला भेटण्यासाठी येत होता.
लुफ्थांसा वेबसाइटच्या लाईव्ह फ्लाइट ट्रॅकरनुसार, LH752 विमान स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता) फ्रँकफर्ट येथे परतल्याची नोंद आहे. हे विमान बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएद्वारे, बोईंग ७८७ विमानांची वाढीव तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाच्या विमान अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. तर हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. यामुळे मृतांचा एकूण आकडा २७४ वर पोहोचला.