

Airport
हैदराबाद: विमान प्रवासापूर्वी वाटणारी भीती, चिंता किंवा तणाव आता काही मिनिटांतच दूर होणार आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि तणावमुक्त करण्यासाठी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येथे प्रवाशांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी खास 'थेरपी डॉग्स' तैनात करण्यात आले आहेत.
विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या GMR समूहाने प्रवाशांचा अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने हा 'थेरपी डॉग प्रोग्राम' सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, विमानतळावर उपस्थित असलेले हे प्रशिक्षित आणि मैत्रीपूर्ण श्वान प्रवाशांना शांतता, प्रेम आणि आपुलकीचा अनुभव देतात. व्यवस्थापनाच्या मते, या श्वानांच्या उपस्थितीमुळे प्रवासासंबंधीची चिंता कमी होण्यास, मनःस्थिती सुधारण्यास आणि विमानतळावर अधिक स्वागतार्ह व शांततापूर्ण वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे.
या कार्यक्रमात सध्या चार प्रशिक्षित 'टॉय पूडल' जातीच्या श्वानांचा समावेश असून, त्यांच्यासोबत त्यांचे व्यावसायिक हँडलर्स (संचालक) देखील आहेत. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार केला जाऊ शकतो, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. हे श्वान प्रमाणित 'थेरपी अॅनिमल्स' असून त्यांना शांत स्वभावासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते नेहमी व्यावसायिक हँडलर्सच्या देखरेखीखाली असतात. कोणताही अनपेक्षित प्रसंग हाताळण्यासाठी आणि श्वान व प्रवासी या दोघांचीही सुरक्षितता आणि सोय सुनिश्चित करण्यासाठी हे हँडलर्स सज्ज असतात.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, जे प्रवासी स्वतःहून या श्वानांजवळ जातात, फक्त त्यांच्याशीच संवाद साधण्याची या श्वानांना परवानगी आहे. यामुळे ज्यांना कुत्र्यांची भीती वाटते किंवा आवड नाही, त्यांना कोणताही त्रास होत नाही. हे 'थेरपी डॉग्स' शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत देशांतर्गत (डोमेस्टिक) आणि आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल) निर्गमन क्षेत्रात (डिपार्चर एरिया) महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असतात.
GMR समूहाच्या मते, प्रवाशांनी या श्वानांच्या शांत उपस्थितीचे भरभरून कौतुक केले आहे. एका प्रवाशाने प्रतिक्रिया देताना म्हटले, "हा खरोखरच एक उत्तम उपक्रम आहे. कृपया तो सुरू ठेवा." दुसऱ्या एका प्रवाशाने म्हटले, "पाळीव प्राणी सोबत असण्याचा आनंद खूप मोठा असतो. हा एक विचारपूर्वक आणि मन जिंकणारा उपक्रम असून तो खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे." उल्लेखनीय आहे की, गेल्या आर्थिक वर्षात हैदराबाद विमानतळावरून तब्बल २.९५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता.