Hyderabad Crime : ९ वर्षांच्या चिमुरडीच्या विनयभंगाचा संशय: हैदराबादमध्ये चहा विक्रेत्याची जमावाच्या मारहाणीत हत्या

Hyderabad Crime : ९ वर्षांच्या चिमुरडीच्या विनयभंगाचा संशय: हैदराबादमध्ये चहा विक्रेत्याची जमावाच्या मारहाणीत हत्या
Published on
Updated on

हैदराबाद : भाग्यनगर (हैदराबाद) येथील जिआगुडा भागात ९ वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका चहा विक्रेत्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलसूमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या आठवड्यात गुरुवारी (दि. १६) दुपारी ही घटना घडली. अब्दुल अझीझ (वय ५० वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल अझीझ हा चहा विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याची पत्नी त्याला सोडून गेली असल्याने तो आपल्या वृद्ध आईसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होता. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास परिसरातील एका दुचाकीवर बसलेल्या ९ वर्षांच्या चिमुरडीजवळ तो गेला आणि तिच्याशी संभाषण सुरू केले. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तो तिचा विनयभंग करत असल्याचे एका शेजाऱ्याच्या निदर्शनास आले. शेजाऱ्याने त्याला हटकले असता, अझीझने तिथून पळ काढला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

परंतु, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला होता. हे सीसीटीव्ही फुटेज समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. संतप्त जमावाने अझीझला गाठून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या अझीझला जमावाच्या ताब्यातून सोडवून उपचारासाठी उस्मानिया जनरल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात एक वेगळे वळण आले असून, मृत संशयिताच्या आईने पोलिसांत उलट तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलाचा जमावाच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news