

high court verdict on marital rape case
ग्वाल्हेर : “पतीने आपल्या पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले तर बलात्काराचा खटला चालवला जाऊ शकत नसला तरी, ते भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ अंतर्गत क्रूरता मानले जाईल,” असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सध्याच्या कायद्यानुसार वैवाहिक बलात्काराची संकल्पना कलम ३७५ मधील स्पष्ट वैवाहिक अपवादामुळे ओळखली जात नसल्याने, कलम ३७६ अंतर्गत बलात्कार म्हणून खटला चालवला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण एकलपीठाचे न्यायमूर्ती राजेश कुमार गुप्ता यांनी नोंदवत पतीविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
दाम्पत्याचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. पत्नीच्या आईवडिलांनी स्वतःच्या इच्छेने २१ लाख रुपये रोख आणि १५ तोळे सोने भेट दिले. लग्नानंतर काही दिवसांमध्ये दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. पतीने मारहाण केल्यानंतर पत्नी माहेरी गेली. तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार केली. तथापि, समुपदेशनानंतर वादावर पडदा पडला. यानंतर पत्नी पुन्हा सासरी गेली. ऑगस्ट २०२३ मध्ये पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली की, पतीने शारीरिक मारहाण करत सक्तीने अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. या फिर्यादीवरून पतीवर क्रूरता (४९८-अ), वारंवार बलात्कार (३७६-२-एन), अनैसर्गिक कृत्य (३७७), मारहाण (३२३) आणि अश्लील कृत्य (२९४) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पतीचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला. तथापि, उच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२३ च्या आदेशान्वये त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. यानंतर पतीने एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पतीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ६ सप्टेंबर २०२३ रोजी कौटुंबिक न्यायालयात पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेला प्रत्युत्तर म्हणून पत्नीने खोटी फिर्याद दिली. या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पतीला पत्नीचे व्हॉट्सॲप मेसेज आणि कॉल रेकॉर्ड सापडले होते. पत्नी इतर व्यक्तींच्या संपर्कात होती. तिला जाब विचारल्यावर, तिने पतीला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ही कारवाई सुरू केल्याचा दावाही पतीने केला होता.
न्यायमूर्ती राजेश कुमार गुप्ता यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ च्या अपवाद २ नुसार, पतीला त्याच्या पत्नीविरुद्ध बलात्काराच्या आरोपांपासून संरक्षण मिळत असल्याने, या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ३७७ अंतर्गत गुन्हे टिकू शकत नाहीत. त्यामुळे कलम ३७६ आणि ३७७ अंतर्गत लावलेले आरोप टिकू शकत नाहीत. पतीने पत्नीवर सक्तीने केलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध हे कलम ४९८-अ अंतर्गत क्रूरतेच्या व्याख्येत येते, मात्र कायद्यातील तरतुदींमुळे तो बलात्कार ठरत नाही,” असे न्यायालयाने नमूद केले. तसेच या आरोपांमध्ये कोणतेही ठोस वैद्यकीय पुरावे सादर करण्यात आले नाहीत. केवळ तोंडी आरोपांवरून हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
न्यायालयाने पतीवरील कलम ३७६(२)(एन) आणि ३७७ (बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य) अंतर्गत असलेले आरोप रद्द करण्याचे आदेश दिले. प्रकरणातील एकूण तथ्ये आणि परिस्थिती विचारात घेऊन, ही याचिका अंशतः मंजूर केली जात आहे, असे स्पष्ट करत या प्रकरणी कलम ४९८-अ (क्रूरता), ३२३ (मारहाण) आणि २९४ (अश्लील कृत्य) अंतर्गत दाखल असलेला गुन्हा कायम ठेवला असून, या कलमांतर्गत पतीवर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.