

Who runs Al Falah University Dr Muzammil Shakeel Connection
नवी दिल्ली : दिल्ली स्फोटाचं फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठाशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. फरिदाबादच्या या विद्यापीठात पोलिसांनी धाड टाकली असून वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठातील काही प्राध्यापक- विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. विद्यापीठातील एकूण 52 पेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आली असून हे विद्यापीठ नेमके कुठे आहे, विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी कुठचे आहेत, विद्यापीठात नेमके कोणते विषय शिकवले जातात हे जाणून घेऊया पुढारी विश्लेषणातून....
70 एकरमध्ये पसरलंय कॅम्पस
फरिदाबाद जिल्ह्यातील धौज येथील 70 एकरच्या हिरव्यागार परिसरात अल फलाह विद्यापीठ असून अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नांमधून हे विद्यापीठ सुरू झाले.
विद्यापीठाच्या आवारात आहेत तीन महाविद्यालये
अल अलाह विद्यापीठाच्या आवारात तीन महाविद्यालये आहेत. यात अल फलाह स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, ब्राऊन हिल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, अल फलाह स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग अशी या तीन महाविद्यालयांची नावे आहेत.
अल फलाह रुग्णालय देखील असून अल फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्स आणि रिसर्च सेंटरअंतर्गत हे रुग्णालय येते. या रुग्णालयात 650 बेड्स आहेत. विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय प्रसिद्ध असून यात एमबीबीएसच्या 200 जागा आणि एमडीच्या 38 जागा आहेत.
विद्यापीठात एमबीबीसीचे शुल्क 74 लाख रुपये
विद्यापीठाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एमबीबीएसच्या पाच वर्षांचे एकूण शुल्क 74 लाख रुपये इतके आहे. तर एमडी स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ या कोर्सचे शुल्क प्रतिवर्ष 29 लाख 90 हजार रुपये इतके आहे. तीन वर्षांच्या कोर्सचे शुल्क 90 लाख रुपयांपर्यंत आहे.
अल फलाह स्कूल ऑफ पॅरामेडिकल अँड हेल्थ सायन्स, अल फलाह स्कूल ऑफ भौतिक विज्ञान असे विविध कोर्सेस देखील विद्यापीठातर्फे चालवले जातात.
विद्यापीठाला युजीसीची मान्यता होती का?
अल फलाह विद्यापीठाची स्थापना 2014 मध्ये हरियाणा विधानसभेच्या विशेष अधिनियमांतर्गत झाली होती. या विद्यापीठाला 2015 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने मान्यता दिली. भारतासह विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतायंत.
शिक्षणाच्या आडून दहशतवादी कारवायांचं षडयंत्र?
स्फोटकांप्रकरणी अल फलाह कॅम्पस रुग्णालयातील डॉ. मुझम्मिल शकील याला जम्मू- काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. यानंतर विद्यापीठ आवारात खळबळ उडाली आहे. मुझम्मिलचा एक सहकारी, विद्यार्थी तसेच प्राचार्यांची चौकशी करण्यात आली आहे. 52 पेक्षा अधिक जणांची आत्तापर्यंत चौकशी करण्यात आल्याचे वृत्त लाईव्ह हिंदुस्तान हा हिंदी वेबसाईटने दिले आहे.
15 दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेली खोली
मुझम्मिलने 15 दिवसांपूर्वीच धौज येथील डहर कॉलनी येथे भाड्याने खोली घेतली होती. मुझम्मिल सर्वांशी चांगला वागायचा. त्यामुळे कधीच संशय आला आहे. त्याचं दहशतवादी कनेक्शन वाचून आम्हाला धक्काच बसला, असे स्थानिकांनी म्हटले आहे. जावेद, अक्रम आणि वहीद हे तिघंही स्थानिक आहेत. ते म्हणतात, आपल्या स्वभावाने मुझम्मिलने सर्वांचा विश्वास संपादन केला आणि घर भाड्यानं घेतले. पण आता कोणीही ओळखपत्र आणि पोलीस पडताळणीशिवाय घर भाड्याने देणार नाही, असं त्यांनी सांगितले. विद्यापीठ सुरू झाल्यापासून फतेहपूर तगा, डरह कॉलनी येथील जागेचे भाव वाढले, स्थानिकांनी घर बांधून विद्यार्थ्यांना भाड्याने खोली द्यायला सुरूवात केली, असंही स्थानिक सांगतात.
मुझम्मिलने जिथे घर भाड्याने घेतले होते त्या इमारतीच्या मालकाचा मुलगा इक्बाल सांगतो, आम्ही डॉक्टरांना बऱ्याच कालावधीपासून ओळखतो. ते सर्वांशी नीट वागायचे. त्यांनी सुटकेस वर नेण्याची विनंती केल्यावर मीच त्यांना मदत केली होती. त्या बॅगेत स्फोटक पदार्थ हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
मुझम्मिलच्या खोलीतून काय जप्त?
मुझम्मिलच्या खोलीतून स्फोटक तयार करण्यासाठीचे साहित्य, 20 टायमर, बॅटरी, रिमोट कंट्रोल, वॉकी टॉकी आणि 12 सुटकेस जप्त करण्यात आल्या. मुझम्मिल हा स्थानिक मशिदीतील मौलानासह बऱ्याच तरुणांच्या संपर्कात होता. विद्यापीठाच्या लॅबमध्ये स्फोटकं तयार केले जात होते का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.