

नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये (एनसीआर) मुसळधार पाऊस झाला. यावेळी वादळीवाऱ्यामुळे झाड कोसळून आईसह तीन मुलांचा असा चौघांचा मृत्यू झाला. तसेच २०० हून अधिक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. दरम्यान, दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे तापमानात घट झाली असून उकाड्यापासून काही काळ सुटका मिळाली.
दिल्लीसह एनसीआरमध्ये गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका विमानांना बसला. जवळपास २०० उड्डाणे उशिरा झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होण्यापूर्वी ३ उड्डाणे अहमदाबाद आणि जयपूरकडे वळवण्यात आली. जयपूरला वळवण्यात आलेल्या विमानांमध्ये बंगळुरू-दिल्ली आणि पुणे-दिल्ली ही विमाने होती. दिल्ली विमानतळावर आगमनासाठी सरासरी २१ मिनिटे आणि प्रस्थानासाठी ६१ मिनिटे उशीर झाला. पाऊस सुरू असतानाच दिल्लीच्या द्वारका येथे जोरदार वाऱ्यामुळे एक झाड घरावर कोसळले. यात एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या अनेक भागात पाणी साचले होते. द्वारका, साउथ एक्सटेंशन रिंग रोड, मिंटो रोड, लाजपत नगर आणि मोती बाग या भागात पाणी साचले होते.