पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. त्याला आपला देशही अपवाद नव्हता. त्याचे परिणाम आपण आजही सहन करत आहोत. देशावरील कोरोनाचे संकट दूर होत चालले असताना फ्लूची एक नवी लाट पसरली आहे. ताप, खोकला, आणि फुफ्फुसातील संसर्गाने घरोघरी रुग्णांना बेजार करून सोडले आहे. या आजारात मृत्यूच्या शक्यतेचे प्रमाण अत्यल्प असले, तरी हा विषाणू सध्या संशोधकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. (H3N2)
तापमानामध्ये होणारे बदल, प्रदूषण आणि प्रतिकारक शक्तीची कमतरता या आजाराला पोषक ठरते आहे. रुग्णाला बरे होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागत आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' या संस्थेने दिली आहे. या साथीने बेजार झालेले अनेक रुग्ण घराघरांमध्ये आढळत आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडे (आयसीएमआर) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा विषाणू एच-3 एन-2 स्वरूपाचा आहे. एन्फ्ल्यूएन्झा-फ्लूचा एक उपविषाणू म्हणून तो ओळखला जातो. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये संपूर्ण देशात हा विषाणू हवेतून संक्रमण करतो आहे. लक्षणे दिसताच रुग्णालयाशी संपर्क साधून त्यावर उपचार झाले, तर रुग्ण गंभीर होण्यापासून वाचू शकतो, असे वैद्यकीय अधिकार्यांचे मत आहे.
आयसीएमआर (Indian Council of Medical Research-ICMR) ने या फ्लू पासून बचाव करण्यासाठी एक मार्गदर्शिका सांगितली आहे. यामध्ये त्यांनी आपण काय करायचं आणि काय करायचं आहे हे सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये H3N2 व्हायरसने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ९२% रुग्णांना ताप होता. ८६% रुग्णांना खोकला होता, २७% रुग्णांना धाप लागणे, १६ % रुग्णांना आवाज बसणे अशा समस्या जाणवतं होत्या. आयसीएमआर ने आपल्या रिपोर्टमध्ये हे सांगितले आहे की, १६% रुग्णांना निमोनिया होता, ६% रुग्णांना दौरे पडणे, त्याचबरोबर छातीमध्ये कफ, अंगदुखी हीही लक्षणे जाणवतात.
आयसीएमआर (ICMR) ने म्हटले आहे की, ताप ३ दिवसात जातो. खोकला साधारण: 3 आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.
प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) अतिवापरापासून टाळा.
आपल्या आजारावर स्वत:च औषधोपचार करु नका.
कोणत्याही स्वरुपाचा त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.
आयसीएमआरने(ICMR) असेही म्हटले आहे की अँटीबायोटिक्स आणि इतर औषधे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावीत.
संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आयसीएमआर (ICMR) ने काही नियमावली सांगितली आहे.त्या पुढीलप्रमाणे.
नियमितपणे पाणी आणि साबणाने हात धुवा मास्कचा वापर करा.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका.
हायड्रेटेड रहा आणि भरपूर जलपदार्थांचे सेवन करा.
ताप आणि डोकेदुखी असेल तर पॅरासिटामॉल वापरा.
सकस आहार.