

Crime News Guwahati student death
गुवाहाटी: गुवाहाटी विद्यापीठातील एका २२ वर्षीय विद्यार्थिनीचा शहराबाहेरील एका लॉजवर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. निमिशा ठाकुरिया (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून, पोलिसांनी याप्रकरणी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. आशिक अली (वय २६) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिशा ठाकुरिया ही समाजशास्त्र विभागातील विद्यार्थीनी होती. निमिशा आणि आशिक हे दोघेही शनिवारी धरारपूर परिसरातील एका लॉजवर एकत्र थांबले होते. आशिकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निमिशाने गळफास घेऊन जीवन संपवले. त्यानंतर आशिक व त्याच्या दोन मित्रांनी निमिशाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून तिला गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. निमिशा आणि आशिक या महिन्यात पाच वेळा याच लॉजवर आले होते. विशेष म्हणजे, कोणतीही योग्य पडताळणी न करता त्यांना खोली देण्यात आली होती.
पोलिसांनी लॉजचा मालक आणि कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली आहे. हा लॉज जयंत साकी नावाच्या व्यक्तीला दरमहा सुमारे १ लाख ३० हजार रुपयांनी भाड्याने दिला होता. खोली क्रमांक १० मध्ये हे दोघे थांबले होते. निमिशा बेशुद्ध पडल्यानंतर आशिक रडत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी पाहिले.
या घटनेनंतर धरारपूर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले आणि निदर्शने केली. या प्रकरणामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आंदोलकांनी निष्पक्ष व सखोल तपासाची मागणी केली आहे. पोलीस आता या दोघांची भेट कशी झाली, त्या रात्री नेमके काय घडले आणि मृतदेहावर आढळलेल्या जखमांचा शोध घेत आहेत.