

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्रामच्या सेक्टर-३७ मधील एका सोसायटीत घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी सुरक्षारक्षकावर किरकोळ चोरीचा आरोप करत त्याला इतकी कठोर शिक्षा देण्यात आली की, ती पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल.
सुरक्षारक्षकाला दोरीने पाय बांधून लोखंडी पाइपला उलटे लटकवण्यात आले आणि त्यानंतर त्याला प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सुमारे दीड मिनिटांचा असून, पार्किंगमध्ये दहा-पंधरा जण उपस्थित होते. पीडित सुरक्षारक्षक हात जोडून क्षमा मागत होता, तरीही कोणीही त्याची दया केली नाही. उपस्थित लोक चोरीबद्दल चर्चा करत होते आणि उलटे लटकवलेल्या व्यक्तीवर चोरीचा आरोप करत होते. ही घटना जवळपास दीड महिना गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणाचा स्वतःहून तपास सुरू केला आणि चार जणांना अटक केली आहे.
सोशल मीडियावर असा दावा करण्यात येत आहे की, मारहाण करणारा व्यक्ती एक इमारत कंत्राटदार आहे आणि तो स्वतःला हरियाणातील केंद्रीय मंत्र्याचा निकटवर्तीय असल्याचे सांगतो. तसेच, त्याची पत्नी उच्च न्यायालयात वकील असल्याचा दावा करत पीडिताला सातत्याने धमकावत होता. मात्र, या दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
पोलिसांनी सांगितले की, २८ जुलै २०२५ रोजी सोशल मीडियावरून हा व्हिडिओ निदर्शनास आला. अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, तसेच पीडितही पोलिसांच्या संपर्कात आलेला नव्हता. तरीही, पोलिसांनी स्वतःहून अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर दाखल करून चार जणांना अटक केली आहे. तसेच पोलीस सध्या पीडिताचाही शोध घेत आहेत.