Gurugram ATM Theft |
गुरूग्राम : हरियाणातील गुरुग्राममधून आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. सेक्टर-३४ मधील एका एटीएममधून चोरट्यांनी एटीएम न उखडता अथवा न तोडता १० लाख रुपये चोरी केले आहेत. चोरीचा असा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आल्याने चक्रावलेल्या पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला आहे.
दिल्ली-जयपूर महामार्गावर रिको ऑटो या उद्योगाजवळ अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. त्यात दोन मशीन बसवल्या आहेत. हे एटीएम हिटाची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे देखभाल केले जाते. त्याचे मुख्यालय तामिळनाडूतील चेन्नई येथील सिलिकॉन टॉवर येथे आहे. या कंपनीचे वकील गौरव कुमार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, त्यांची कंपनी अॅक्सिस बँकेच्या ज्या एटीएमची देखभाल करते त्या एटीएममधून १० लाख रुपये ३० एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मशीन न तोडता चोरले.
या एटीएममध्ये बसवलेले डीव्हीआर, बॅटरी आणि हार्ड डिस्क चोरट्यांनी चोरल्याचा आरोप आहे. एटीएममधून पीसी कोर आणि चेस्ट लॉक देखील गायब आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी या कंपनीला नोटीस बजावली आहे. देखभाल पथकातील कोणीतरी अधिकारी किंवा कर्मचारी चोरट्यांना सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रत्येक एटीएम एका अलार्मला जोडलेले असते. कोणतीही समस्या लगेच दिसून येते, परंतु या प्रकरणात असे घडले नाही. रिको कंपनीचे आणि या एटीएमच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. पोलिसांसमोर असा प्रकार पहिल्यांदाच आला आहे. एटीएम उघडण्यासाठी चावी आवश्यक असते आणि आतील डिजिटल लॉक उघडण्यासाठी पासवर्ड आवश्यक असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चोरीच्या १० व्या दिवशी पैशांच्या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. हे एटीएम हॅक करून हॅकर्सनी ही रक्कम काढली आहे का? याचाही तपास पोलिस करत आहेत.
आतापर्यंत या कंपनीने पोलिसांना सांगितले आहे की, तपासादरम्यान एटीएममधून १० लाख रुपये काढले गेल्याचे आढळून आले. परंतु कोणत्या खात्यातून पैसे काढले गेले याची माहिती समजत नव्हती. चौकशी केली असता, ही रक्कम एटीएममधून चोरीला गेल्याचे आढळून आले. गुरूग्राम पोलिस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार म्हणाले की, या प्रकरणात देखभाल करणाऱ्या कंपनीची तक्रार संशयास्पद वाटते. चोरीच्या १० व्या दिवशी तक्रार दाखल करण्यात आली. एटीएम न फोडता किंवा उखडून न टाकता पैसे काढले गेले आहेत. चावी आणि पासवर्ड कंपनीच्या अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे असतो. अशा परिस्थितीत, सुरुवातीच्या तपासात कोणाचा तरी सहभाग दिसून येत आहे.